Amit Thackeray : प्रत्येकाचे विचार, पक्ष वेगवेगळे ; कशाला हवेत सगळे ठाकरे एकत्र?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१५ ऑक्टोबर । अमित ठाकरे यांनी मनविसे पुनर्बांधणीसाठी जूनपासून महाराष्ट्र दौरा सुरु केला आहे. त्याअंतर्गतच आठ दिवसांपूर्वी तुळजापूर येथून सुरू झालेल्या दौऱ्याचा समारोप औरंगाबादेत झाला. यावेळी पत्रकारांशी त्यांनी गुरुवारी (ता. १३) रात्री अनौपचारिक संवाद साधला.

सगळ्या ठाकरेंनी एकत्र यावे, असे मला वाटत नाही. कारण प्रत्येकाचे विचार, पक्ष वेगवेगळे आहेत. तसा प्रयत्नही ठाकरे परिवारांमध्ये होत नाही आणि कशाला हवेत सगळे ठाकरे एकत्र, असा प्रतिप्रश्‍न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, असे लोकांना वाटते, याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी ही प्रश्‍नवजा टिप्पणी केली. तसेच याविषयी अधिक बोलण्यासही त्यांनी रस दाखवला नाही.

दरम्यान, मला बाळासाहेबांचा फारसा सहवास लाभला नाही. पण, मी लहानपणी जेव्हा त्यांना भेटायचो तेव्हा ते मला ‘ब्रुसली’ म्हणायचे. एवढंच आठवतं,’’ असा हळवा कोपरा उलगडताना अमित यांचा कंठ दाटून आला होता. त्याचवेळी सध्या शिवसेनेत जे सुरू आहे, त्यासाठी काहीच वाटत नाही मात्र, बाळासाहेबांसाठी नक्की वाईट वाटते, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

श्री. ठाकरे म्हणाले, ‘‘मनविसेची नव्याने बांधणी करत असताना जे मनसैनिक आंदोलन करतात, त्यांना मला पहिले भेटायचे होते. त्यांना भेटलो. काही मनसैनिक चांगले आंदोलन करत होते. पण ते माझ्यापर्यंत पोचत नव्हते. या दौऱ्यानिमित्त ते साध्य झाले. स्पर्धा परीक्षा आणि रोजगार या तरुणांच्या प्रश्‍नांवरच महाराष्ट्र पेटून उठतो, हे लक्षात आले. तरुणांच्या समस्या सोडवण्यासाठी मनविसे प्रयत्न करेल. स्पर्धक म्हणून मी कुणालाच पाहत नाही, माझा पक्ष बांधणे, हाच माझा उद्देश आहे. ठिकठिकाणचे स्वागत पाहून डोळ्यात पाणी येत होते.’’

मी सात-आठ वर्षे पक्षाचे काम पाहिले. त्यांनी आधीच सांगितले होते, की मी तुला लोकांवर लादणार नाही. त्यांनी स्वीकारले तर, राजकारणात ये. त्यानंतर २०१९ मध्ये राज साहेबांनी माझ्यावर जबाबदारी दिली. कोणी गरजेपुरता मनसेला वापरतोय असे वाटत नाही. सध्याचे राजकारण पाहता, महाराष्ट्रालाच मनसेची गरज आहे, हे स्पष्ट होत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दौऱ्यानिमित्त मी पहिल्यांदाच मुलगा किआनपासून दूर आहे. त्यामुळे त्याला सर्वाधिक मिस करतो. तो राज आजोबांसोबत शिवाजी पार्कमध्ये जाऊन बसलाय. नुकताच त्याच्यासोबत फेसटाइमवर बोललोय, असे सांगत किआनचा सध्याचा आणि स्वत:चा लहानपणीचा सारखाच दिसणारा फोटोही अमित ठाकरे यांनी दाखवला.

आणखी एक ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? असा प्रश्‍न पत्रकारांनी विचारल्यावर वेळ पडली तर बघू असे म्हणत, हो किंवा नाही, असे उत्तर देणे अमित ठाकरे यांनी टाळले. याचवेळी शेवटी पुढचा महाराष्ट्राचा दौरा विधानसभानिहाय असेल, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईतील फेरीवाल्यांचा प्रश्‍न निकाली काढला. तसाच भोंगा हा विषयही हाती घेतला आहे. आमच्या आंदोलनाने गत सरकारला जागे केले. आता ते आताच्या सरकारने सुरु ठेवायला हवे. आमची सत्ता आली तर, भोंग्याचा प्रश्‍न कायमस्वरूपी मार्गी लावू आणि आमची सत्ता २०२४ नक्की येईल.’’ असा विश्‍वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *