राज्यात विजेच्या मागणीत अचानक घट ; कारखान्यांना सुट्या, वीजनिर्मिती संच बंद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२६ ऑक्टोबर । दिवाळीमुळे सलग असलेल्या सुट्या व वातावरणात वाढणाऱ्या गारव्यामुळे राज्यात विजेची मागणी कमी झाली असून, त्यामुळे महानिर्मितीचे बहुतेक संच बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात २० हजार मेगावॅटपर्यंत गेलेली विजेची मागणी अचानक घटल्यामुळे राज्यात महानिर्मितीचे ८ संच रिझर्व्ह शटडाऊन खाली बंद ठेवण्यात आले आहेत.

घरगुती, कृषी, व्यावसायिक व इंडस्ट्रियल ग्राहकांचा विचार करता घरगुती व कृषीसाठी विजेचा वापर करणारे ८० टक्के ग्राहक आहेत, तर व्यावसायिक आणि उद्योगांसाठी २० टक्के वापर केला जातो. या २० टक्के ग्राहकांकडूनच ८० टक्के वीज बिलापोटी महसूल मिळतो. त्यामुळे ८० टक्के महसूल देणारे व्यवसाय, कारखाने, कार्यालये दिवाळीच्या सलग सुट्यांमुळे बंद असल्याने २५ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजेदरम्यान विजेची मागणी कमी होऊन १४,९७८ मेगावॅटपर्यंत आली.

महानिर्मितीच्या नाशिक, कोराडी, खापरखेडा, पारस, परळी, चंद्रपूर, भुसावळ यासह उरण गॅस, हायड्रो, सोलर, वायू यांची मिळून ३,५२० मेगावॅट वीजनिर्मिती आहे. खासगी जिंदाल, अदानी, धारिवाल, एस.डब्ल्यू.पी.जी.एल. व इतरांची मिळून ५,५३६ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे.

हे संच आहेत बंद
महानिर्मितीच्या राज्यातील २७ संचांपैकी पारस येथील एक संच वार्षिक देखभाल दुरुस्तीसाठी, नाशिकचा एक संच कोळसा डायव्हर्ट केल्याने, कोराडी येथील एक संच बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद आहेत, तर भुसावळचा एक, परळीचे तीन व चंद्रपूरचे चार संच रिझर्व्ह शटडाऊनमुळे बंद केल्याचे सूत्रांनी सांगितले.

केंद्रांतील उत्पादन असे
मंगळवारी दुपारी दोनच्या दरम्यान नाशिकची क्षमता ६३० मेगावॅटपैकी दोन संच सुरू असल्याने उत्पादन २१७, कोराडीला २४०० क्षमतेपैकी उत्पादन ८०६, खापरखेडा येथे १३४० क्षमता असून ५६२, पारस ५०० क्षमता असून १२६, परळी ११७० क्षमता असून ५, चंद्रपूर २९२० क्षमता असून ८२१, भुसावळ १२१० क्षमता असून ५३६, उरण ४३२ मेगावॅट क्षमता असून ८७ मेगावॅट वीज उत्पादन सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *