अत्याधिक पावसानंतर आता तीव्र थंडीचा प्रभाव जाणवणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ ऑक्टोबर । ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि थंडीने आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. हवामानाचा सुरू असलेला ट्रेंड कायम राहणार असून, यावर्षी ज्याप्रमाणे अत्याधिक पावसाने सतावले, त्याप्रमाणे तीव्र थंडीचा प्रभाव जाणविण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गारठविणाऱ्या थंडीच्या दोन ते तीन लाटा येण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

पॅसिफिक महासागरात वातावरण थंड असणे म्हणजे ‘लॉ-निनो’ चा प्रभाव मागील तीन वर्षांपासून कायम आहे. यालाच ‘ट्रिपल डीप’ प्रभाव असेही म्हणतात. १९५० नंतर पहिल्यांदाच अशी परिस्थिती दिसून येत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात अत्याधिक तापमान, पावसाळ्यात अत्याधिक पाऊस आणि हिवाळ्यात अधिक थंडीची जाणीव होते. हा ट्रेंड यावेळीही कायम राहणार असून, कडक थंडी तीव्रतेने जाणवेल.

विशेष म्हणजे, नासा, वर्ल्ड मेट ऑर्गनायझेशन यांसारख्या संस्थांनी उत्तर गोलार्धातील अमेरिका, युरोपमध्ये कडक थंडीचा इशाराही दिला आहे. या उत्तर गोलार्धातून वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव भारतीय उपखंडातही जाणवेल, अशी शक्यता हवामान अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी व्यक्त केली आहे. तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबरमध्ये गारवा वाढणार असून, डिसेंबर आणि जानेवारी हे महिने तीव्र थंडीचे असतील. डिसेंबरमध्ये दुसऱ्या व चौथ्या आठवड्यात थंडीच्या लाटा येतील, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात गारठा अत्याधिक असेल. लॉ निनोच्या प्रभावाने या काळात ढगाळ वातावरणासह एकदोनदा पावसाच्या सरीही येतील.

दरम्यान, पाऊस निघून गेल्यानंतर आकाश स्वच्छ आणि निरभ्र झाल्याने थंडी जाणवायला लागली आहे. विदर्भात सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान स्थिर असले, तरी रात्रीचे तापमान तीव्रतेने घटत आहे. अमरावती व यवतमाळला पारा सरासरीपेक्षा ४ व ४.४ अंशांनी घटून अनुक्रमे १४.३ व १४ अंशांपर्यंत खाली आला आहे. नागपुरात किमान तापमान १५.६ अंश नोंदविण्यात आले. यासह वर्धा १६ अंश, गडचिरोली १६.२ अंश व इतर जिल्ह्यांत १७ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. नोव्हेंबरमध्ये यात आणखी घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *