‘५ जी’च्या नावावर सायबर गुन्हेगार सक्रिय ; या राज्यातून रॅकेटचे संचलन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ ऑक्टोबर । नुकताच काही टेलिकॉम कंपन्यांची ५ जी नेटवर्क सेवा सुरू झाली असून ही सेवा ठराविक शहरापुरती मर्यादित आहे. परंतु, सायबर गुन्हेगारांनी अनेकांना फोन करून किंवा ई-मेल पाठवून ५ जी सेवा पोर्ट करण्याचे आमिष दाखवून जाळे पसरवले आहे. दिल्ली आणि झारखंड या राज्यातील सायबर गुन्हेगार हे रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

सध्या भारतातील काही ठराविक शहरात ५ जी नेटवर्क सेवा सुरू झाली आहे. अन्य काही शहरात दुसऱ्या टप्प्यात ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ५ जी मध्ये अतिवेगाने इंटरनेट सेवा मिळणार असल्यामुळे अनेकांना उत्सुकता आहे. त्यामुळे अनेक जण ५ जी नेटवर्क सेवेची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच संधीचा गैरफायदा सायबर गुन्हेगारांच्या टोळ्या घेत आहेत. टेलकॉम कंपनीच्या प्रतिनिधींच्या नावाने फोन करणे सुरू केले आहे. तर काही टोळ्यांनी थेट समाज माध्यमांवरून ग्राहक हेरणे सुरू केले आहे. टेलकॉम कंपन्यांच्या ट्विटरवर ग्राहकांनी नेटवर्कबाबत टाकलेल्या समस्याधारकांनाही सायबर गुन्हेगार लक्ष्य बनवत आहेत. सीमकार्डमध्ये ५ जी सेवा अपडेट करून देण्याच्या नावावर अनेकांना फोन आणि ई-मेल येत आहेत. अनेक जण सायबर गुन्हेगारांनी नव्याने फेकलेल्या जाळ्यात अडकले आहेत. कुणाच्याही मोबाईल क्रमांकावर ५जी अपडेशनची लिंक पाठवून त्यावर केवळ एका क्लिकवर बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळवून फसवणूक केल्याच्या घटना समोर येत आहेत.

५ जी सेवेसाठी सीमकार्ड अपडेट करण्यासाठी फोन, लिंक किंवा संदेश आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये. कुणीही बँक खात्याची माहिती, एटीएम कार्डची माहिती किंवा अन्य खासगी माहिती मागितल्यास देऊ नये. त्या मोबाईल क्रमांकाला ब्लॉकलिस्टमध्ये टाकावे. लिंक आल्यास ती उघडू नये तसेच पुढेही कुणाला पाठवू नये. कुणाला ओटीपीसुद्धा सांगू नये. अन्यथा आपल्या खात्यातून पैसे परस्पर काढल्या जातील.

५ जी स्मार्टफोनचेही आमिष
सध्या बाजारात ४ जी ऐवजी ५ जी नेटवर्क सपोर्ट करणारे स्मार्टफोन आले आहेत. ५ जी नेटवर्कसाठी अनेक जण अपडेट स्मार्ट फोन विकत घेत आहेत. त्यामुळे आता मोबाईल कंपन्यासुद्धा जाहिरात करताना 5 जी स्मार्टफोन असे सांगत आहेत. त्यामुळे अनेकांना ५ जी नेटवर्क सेवा सुरू झाल्याचा भास होता. परंतु, येत्या जानेवारीर्पयंत ही सेवा नागपुरात सुरू होणार नसल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *