महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२७ ऑक्टोबर । पारंपरीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला एका थरारक मुकाबल्यामध्ये पराभूत केल्यानंतर हिंदुस्थानी संघ आज नेदरलँडशी भिडणार आहे. ऑस्ट्रेलियात टी20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून आजचा मुकाबला हा सिडनीमध्ये खेळवण्यात येणार आहे. मात्र या सामन्यात पावसाचा व्यत्यय येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. weather.com ने वर्तवलेल्या अंदाजानुसार सिडनीमध्ये ढगाळ वातावरण असेल आणि पावसाची दाट शक्यता आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर दुसरा सामना पावसात वाहून गेला तर हिंदुस्थानी संघाचं उपांत्य फेरीत पोहोचण्याचं गणित गडबडेल का? असा प्रश्न क्रिकेटरसिकांना पडला आहे.
नेदरलँडविरूद्धचा सामना पावसामुळे वाया गेला तरी हिंदुस्थानी संघ उपांत्य फेरीत पोहोचू शकतो कारण त्याच्याकडे 3 अंक असतील. मात्र उपांत्य फेरीची वाट सुकर करण्यासाठी हिंदुस्थानी संघाला दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि झिम्बाब्वे या तीनही संघांना हरवावेच लागेल. दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानी संघाला हरवलं आणि टीम इंडियाने बांग्लादेश आणि झिम्बाब्वेच्या विरोधात विजय मिळवला तर हिंदुस्थानी संघाला 7 गुण मिळतील. मग नेट रन रेटच्या आधारे उपांत्य फेरीतील संघाची निवड होईल.
पाकिस्तानी संघाने जर दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि झिम्बाब्वे या तीनही संघांना हरवलं तर त्यांच्याकडे 8 अंक असतील आणि पाकिस्तानी संघ हिंदुस्थानी संघाच्या पुढे निघून जाईल. दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तानकडून हरला मात्र तो हिंदुस्थान, बांग्लादेश आणि नेदरलँडला हरवण्यात यशस्वी झाला तर त्याच्याकडे 7 अंक जमा होतील. या स्थितीत हिंदुस्थानी संघ आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ यांच्यात नेट रन रेटच्या आधारे निवड होईल. याचाच अर्थ असा की नेदरलँडविरूद्धचा सामना पावसामुळे वाया गेला तर हिंदुस्थानी संघाला उरलेले सगळे सामने जिंकावेच लागतील तर त्याचा उपांत्य फेरीचा प्रवास सुकर होईल.