महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ नोव्हेंबर । टी-२० विश्वचषकानंतर भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यासाठीचे संघ देखील बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आले आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजा डिसेंबरमध्ये बांगलादेश दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघात परतणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी सोमवारी याची घोषणा केली. ३३ वर्षीय जडेजा आशिया चषक स्पर्धेदरम्यान गुडघ्याच्या दुखापतीमुळे आणि त्यानंतरच्या शस्त्रक्रियेमुळे सध्या चालू असलेल्या टी-२० विश्वचषकाला मुकला.
गेल्या काही आठवड्यांमध्ये, या अष्टपैलू खेळाडूने त्याचे दुखापतीतून ठीक होत असल्याचे व्हिडिओ शेयर केले आहेत. मुख्य निवडकर्ता शर्मा म्हणाले की, जडेजाचा संघात समावेश त्याच्या फिटनेस चाचणीवर अवलंबून आहे. दरम्यान, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे सीनियर खेळाडू देखील ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकानंतर पाच दिवसांनी सुरू होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यातून विश्रांती घेतल्यानंतर बांगलादेश दौऱ्यासाठी परततील. रजत पाटीदार आणि राहुल त्रिपाठी यांनी भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील पांढऱ्या चेंडूंच्या मालिकेदरम्यान आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठीही त्यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयाल याचा प्रथमच भारतीय संघात समावेश झाला आहे.
जसप्रीत बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-२० विश्वचषकालाही मुकावे लागले आहे आणि तो दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे तो न्यूझीलंड आणि बांगलादेशच्या दौऱ्यांमधून बाहेर असेल. त्याच्या पुनरागमनाच्या अंतिम मुदतीबद्दल शर्मा यांना विचारले असता ते म्हणाले, निवडकर्ते त्याला संघात परत आणण्याचा विचार करतील. पुढे म्हणाले, ‘मी नेहमीच खेळाडूंच्या वर्क मॅनेजमेंटबद्दल बोलतो. वर्कलोड मॅनेजमेंट ही अशी गोष्ट आहे ज्याचे आपण बारकाईने पालन करतो. विश्वचषक जवळ येत असताना आम्ही जसप्रीत बुमराहसोबत घाई करण्याचा प्रयत्न केला आणि काय झाले ते पाहा, आम्ही विश्वचषकात जसप्रीत बुमराहशिवाय आहोत. एनसीए संघ आणि वैद्यकीय संघ त्याची चांगली काळजी घेत आहेत आणि तो लवकरच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघाचा भाग असेल. मात्र बांगलादेशविरुद्ध आम्ही जसप्रीत बुमराहचा अधिक विचार करत आहोत.
हनुमा विहारीला दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वगळण्यात आले आहे, जी आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहे, अजिंक्य रहाणेला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून व इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यातून वगळण्यात आल्याने त्याची निवड होऊ शकली नाही. “रणजी करंडक येत आहे आणि विजय हजारेही आहे. तो दोन्ही ठिकाणी आपली कामगिरी चोख बजावेल, अशी आशा करूया, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांसाठी दरवाजे नेहमीच खुले असतात. जर तुम्ही मधल्या फळीकडे बघितले तर तेथे बरेच खेळाडू आहेत, त्यामुळे हनुमा विहारीची जागा तयार करणे खूप कठीण आहे. त्यामुळे यासाठी कोणत्या प्रकारच्या कामगिरीची आवश्यकता आहे, हे निवडकर्त्यांनी अजिंक्यला सांगण्याची गरज नाही. त्याला हे समजले आहे आणि कसोटी संघात पुनरागमन कसे करायचे, हे त्याला ठाऊक आहे.
भारताच्या बांगलादेश दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेने होईल, ढाका येथे ४, ७ आणि १० डिसेंबर रोजी तीन सामने खेळवले जातील. पहिला कसोटी सामना १४ ते १८ डिसेंबर दरम्यान चितगाव येथे खेळवला जाईल आणि २२ ते २६ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या कसोटीसाठी संघ ढाका येथे रवाना होतील. कसोटी सामने आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपचा भाग आहेत.
भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.
भारताचा एकदिवसीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल , वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चहर आणि यश दयाल.