Gold Price: लवकरच सोन्याचे भाव कोसळणार ? समोर येतंय असं कारण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । तुम्ही सोने खरेदीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचे भाव हे स्थिर आहेत. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने ५६ हजार रुपये प्रति १० ग्रॅम हा उच्चांक गाठला होता. तेव्हापासून सोन्याच्या दरात घसरण सुरू आहे. तसेच त्यानंतर सोन्याचे दर हे फारसे वधारलेले नाहीत.

जागतिक मंदीच्या वातावरणामुळे पुढच्या काही काळातही सोन्याच्या किमतींमध्ये घट होण्याची शक्यता आहे. गोल्ड वर्ल्ड कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार भारतामध्ये ऑक्टोबरपासून डिसेंबरदरम्यान सोन्याच्या खपामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे एक चतुर्थांश एवढी घट होऊ शकते.

सणावारांच्या दिवसांमध्ये विक्रीमध्ये वाढ अवश्य झाली आहे. मात्र ज्या आकड्यांची अपेक्षा होती, तिथपर्यंत विक्री झालेली नाही. सोन्यांच्या किमतींमध्ये झालेल्या घटीमागे महागाई हे सर्वात मोठं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. विशेषकरून ग्रामीण भागांमध्ये सोन्याची मागणी कमी होऊ शकते. ग्रामीण भागामध्ये लोक या हंगामात मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी करतात.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार १ नोव्हेंबरला सराफा बाजारामध्ये सोने स्वस्त होऊन ५० ४६० रुपयांवर आलं होतं. गेल्या महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचा दर हा ५२ हजारांवर होता. तर ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याने उच्चांक नोंदवला होता. तेव्हा प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ५६ हजारांवर गेला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *