T20 World Cup, IND vs BAN : पाऊस न थांबल्यास, DLS नुसार बांगलादेश जिंकेल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ नोव्हेंबर । भारताच्या १८४ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशने तुफानी खेळी केली. बांगलादेशच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. लिटन दास व नजमूल शांतो यांनी बांगलादेशला दमदार सुरुवात करून दिली. पावसामुळे जर हा सामना रद्द झाल्यास DLS नुसार बांगलादेशचा विजय पक्का होईल. मग, ग्रुप २ मधून उपांत्य फेरीत जाण्याचे गणित पूर्णपणे बिघडेल.

लोकेश राहुल व विराट कोहली या दोघांनी भारतीय संघाला मजबूत स्थिती मिळवून दिली. रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आजही अपयशी ठरले. सूर्यकुमार यादवने त्याच्या शैलीत फटकेबाजी केली, परंतु आज मोठी खेळी करण्यापासून चूकला. लोकेश ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकार खेचून ५० धावांवर बाद झाला. विराटसह त्याने ६७ धावांची भागीदारी केली. सूर्या १६ चेंडूंत ३० धावा ( ४ चौकार) करून माघारी परतला. विराटने अखेपर्यंत फटकेबाजी करताना भारताला मोठा पल्ला गाठून दिला. अश्विन यानेही ६ चेंडूंत १३ धावा कुटल्या. विराट ४४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ६४ धावांवर नाबाद राहिला. भारताने ६ बाद १८४ धावांचा डोंगर उभा केला.

बांगलादेशच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. लिटन दासने २१ चेंडूंत अर्धशतक झळकावले. नजमूल शांतोसह त्याने पहिल्या ६ षटकांत ६० धावा चढवल्या आणि त्यात त्याच्या एकट्याच्या ५६ धावा होत्या. ७ षटकांत बांगलादेशच्या ६६ धावा झाल्या आहेत आणि पावसाची एन्ट्री झालीय. DLS नियमानुसार जर आता निकाल लागल्यास बांगलादेशचा विजय निश्चित होती, ते १७ धावांची पुढे आहे. या सामन्यात पाऊस खोडा घालेल हे जाणूनच बांगलादेशने आक्रमक फटकेबाजी केली.

ग्रुप २ चं गणित
सध्या ग्रुप २ मध्ये दक्षिण आफ्रिका ५ गुणांसह आघाडीवर आहे. बांगलादेशने विजय मिळवल्यास ते ६ गुणांसह अव्वल स्थानी जातील आणि भारताला ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर जावे लागेल. अशात दक्षिण आफ्रिका व बांगलादेशच्या उपांत्य फेरीतील आशा बळावतील. भारताचा अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध आहे आणि ती जिंकल्यास त्यांचेही ६ गुण होतील. अशात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश हा सामना भारतासाठी निर्णायक ठरेल. पाकिस्तान जिंकल्यास भारताचा मार्ग मोकळा होईल. पण, पाकिस्तानने उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास नेट रन रेटवर निर्णय ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *