महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ नोव्हेंबर । दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मेगा प्रोजेक्ट असलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ची घोषणा करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थित या चित्रपटाचा नारळ वाढवण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला तर राज ठाकरे यांना सिनेमाला क्लॅप देण्याची विनंती करण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यासमोर क्लॅप दिला.
सिनेमाच्या निमित्ताने राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच मंचावर दिसल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यातच राज ठाकरेंनी सिनेमाला क्लॅप देताना थेट मुख्यमंत्र्यांनाच क्लॅप दिला. झालं असं की, मुख्यमंत्री शिंदे यांच्या चेहऱ्यासमोरच राज यांनी क्लॅप देत मुख्यमंत्र्यांना हिरो बनवण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. वेडात मराठे वीर दौडले ४० चे प्रोड्युसर, दिग्दर्शक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, असा उल्लेख राज ठाकरेंनी मंचावर केला.
महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या सिनेमातून बिग बॉस फेम जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे आणि विशाल निकम हे त्रिकूट मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत प्रख्यात अभिनेते प्रवीण तरडे दिसणार आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार असणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यावर वाकडी नजर ठेवून असलेल्या बेहलोल खानला सात शिलेदारांनी कशी झुंज दिली, यावर या चित्रपटाचं कथानक आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित सिनेमाला राज ठाकरे यांनी क्लॅप दिला.
कोण साकारणार कुठली भूमिका?
प्रतापराव गुजर – प्रवीण तरडे
जीवाजी पाटील – विराट मडके
दत्ताजी पागे – सत्या मांजरेकर
तुळजा जामकर – जय दुधाणे
मल्हारी लोखंडे – हार्दिक जोशी
सूर्याजी कडे- उत्कर्ष शिंदे
चंद्राजी कोठार – विशाल निकम