महाराष्ट्र गारठला : उत्तरेकडील थंड व कोरड्या वाऱ्यांमुळे वाढला गारठा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ नोव्हेंबर । काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी होत असून उत्तरेकडून थंड व कोरडे वारे वाहत असल्याने उत्तर महाराष्ट्र गारठला आहे. बुधवारी यंदाच्या हंगामातील ९ अंश सेल्सियस एवढे नीचांकी तापमान धुळे येथील कृषी महाविद्यालयात नोंदवण्यात आले. नाशिकला पारा १२.६, जळगावी १२, तर औरंगाबादला १४.५ वर होता.

कारगिल, लेह जिल्ह्यात मंगळवारी जोरदार हिमवृष्टी झाल्याने तिकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील किमान तापमान घसरले आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीमुळे किमान तापमानात घसरण होत आहे, तर राज्यात सरासरीच्या किमान आणि कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सियसने घसरण झाली आहे.

शहरांतील किमान तापमान
धुळे ९
जळगाव १२
नाशिक १२.६
औरंगाबाद १४.५
पुणे १५.१
अमरावती १५.१

असा राहणार अंदाज
उत्तर महाराष्ट्रात आगामी तीन ते चार दिवस किमान तापमान ९ ते १३ अंश सेल्सियसदरम्यान राहणार असून सध्या वातावरणातील आर्द्रताही कमी झाली आहे. सौराष्ट्र व कच्छ भागात थंडीचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा परिणाम उत्तर महाराष्ट्रातील तापमानावर होत आहे. – माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ

उत्तर भारतातून येणाऱ्या सात गाड्या धावताहेत विलंबाने

उत्तर भारतात वाढलेली थंडी, धुक्यामुळे भुसावळकडे येणाऱ्या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक प्रभावित झाले आहे. समस्तीपूर-एलटीटी ही गाडी २४ तास विलंबाने धावत आहे. एकूण ७ गाड्या विलंबाने धावत असल्याने प्रवाशांना स्थानकांवर ताटकळत बसावे लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात थंडी व धुक्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे उत्तरेकडून भुसावळमार्गे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिरा धावत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *