महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ नोव्हेंबर । पोटाची खळगी भरणारा आणि खिशाला परवडणारा वडापावही आता महाग होण्याची शक्यता आहे. वडापावलाही महागाईच्या तीव्र झळा बसल्या आहेत. पेट्रोल-डिझेल, पीठ आणि इतर जीवनावश्यक गोष्टींचे वाढते दर लक्षात घेता आता वडापावची किंमतीही वाढण्याची शक्यता आहे.
वड्यासोबत पाव चवीने खाणाऱ्यांसाठी किंवा चहासोबत पाव खाणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. पावाची किंमत वाढण्याची शक्यता आहे. अवघ्या दोन रुपयांना मिळणाऱ्या पावासाठी आता तीन रुपये मोजावे लागणार आहेत. पावाच्या दरात वाढ झाल्याने वडापावचे दर वाढण्याची शक्यता आहे.
यंदा तिसऱ्यांदा पावाच्या दरात वाढ झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात 50 पैशांवरून 1 रुपया प्रति नग दरवाढ करण्यात आली. कच्चा मालाचे दर वाढल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
काही ठिकाणी पावाचे दर 2.50 पैसे असून पावाची साइज छोटी करण्यात आली आहे. तर काही काही ठिकाणी 3 रुपये पावाची किंमत करण्यात आली आहे. किंमत वाढवली तर पाव घेण्याचं प्रमाण कमी होईल अशी भीती बेकरी व्यवसायिकांना आहे.
पाव ही अशी गोष्ट आहे जी अनेक गोष्टींसोबत खाल्ली जाते. वडापावच नाही तर भजी पाव, समोसा पाव, वडापाव, मिसळ पाव, भुर्जी पाव, ऑम्लेट पाव, त्यामुळे आता जिथे जिथे पाव येतो तिथल्या किंमती वाढणार का? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. त्यामुळे एकूणच आता लोकांना पाव खाण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याची माहिती मिळाली आहे.