महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ नोव्हेंबर । शिदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातील सिल्लोड शहरात आदित्य ठाकरे यांच्या सभेला अखेर परवानगी देण्यात आली आहे. शहरातील आंबेडकर चौकाजवळच्या मोकळ्या मैदानात सभा घेण्यास औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी परवानगी दिलीय. 7 नोव्हेबंर या तारखेला खासदार श्रीकांत शिंदे आणि आदित्य ठाकरे यांचा एकाच दिवशी सिल्लोड शहरात दौरा आहे. या दरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी यापूर्वी आदित्य ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली होती.
आदित्य ठाकरे आणि श्रीकांत शिंदे हे दोघेही 7 नोव्हेंबरला सिल्लोडला सभा घेणार आहेत. त्यामध्ये खासदार शिंदे यांच्या जिल्हा परिषदेच्या मैदानात होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली. मात्र त्याच वेळी आदित्य ठाकरे यांच्या महावीर चौकामध्ये होणाऱ्या सभेला परवानगी नाकारण्यात होती.
सिल्लोड शहरातील महाविर चौकामध्ये आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी मागण्यात आली होती. पण ती नाकारण्यात आली, लगेच तासाभरानंतर ठाकरेंना सिल्लोड शहरातील आंबेडकर चौकाजवळील मोकळ्या मैदानात सभा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून तासाभरातच ही परवानगी मिळाल्याने आदित्य ठाकरेंना पुन्हा सहानुभूती मिळू नये यासाठी परवानगी दिली गेली का? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान एकाच दिवशी दोन्ही नेत्यांचा शहरात दौरा असल्याने उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याची शक्यता होती. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत पोलिसांनी आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली होती. आता दोन्ही नेत्यांना परवानगी मिळाल्याने श्रीकांत शिंदे-आदित्य ठाकरे असा सामना सिल्लोडमध्ये पाहायला मिळणार आहे.