महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ नोव्हेंबर । श्रीलंकेचा आघाडीचा फलंदाज दनुष्का गुणतीलकाला बलात्काराच्या प्रकरणात सिडनी पोलिसांनी अटक केल्याने टी २० वर्ल्डकपमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीलंकेच्या टीमने शनिवारी इंग्लंडविरोधात वर्ल्डकपमधील अखेरचा सामना खेळला होता. या मॅचनंतर काही वेळातच पोलिसांनी गुणतीलकाला अटक केली. अन्य खेळाडू त्याच्याशिवायच श्रीलंकेला रवाना झाले.
ऑस्ट्रेलियामध्ये टी २० वर्ल्डकप सुरु आहे. गुणतीलक याला दुखापतीमुळे टुर्नामेंटमधून बाहेर व्हावे लागले होते. त्याच्या जागी अशीन बंडाराला घेण्यात आले होते. तरी देखील गुणतीलक हा पूर्ण दौऱ्यादरम्यान संघासोबत होता. त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या झाली होती. महत्वाचे म्हणजे २०१८ मध्ये देखील गुणतीलकवर असेच आरोप करण्यात आले होते.
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला रोझ बे येथे एका 29 वर्षीय महिलेने त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. ऑनलाइन डेटिंग अॅपद्वारे ही महिला गुणतीलकच्या संपर्कात आली होती. २ नोव्हेंबरला दोघे भेटले होते. यावेळी त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. तपासाचा एक भाग म्हणून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली असून त्याच्या आधारेच गुणतीलकला अटक करण्यात आल्याचे न्यू साउथ वेल्स पोलिसांनी म्हटले आहे. त्याच्यावर महिलेच्या संमतीविना शरीर संबंध ठेवल्याचे चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
