कार्तिकीसाठी आलेले वारकरी परतीच्या मार्गावर, जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता ।।

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ नोव्हेंबर । जातो माघारी पंढरीनाथा। तुझे दर्शन झाले आता ।। अशी आर्त हाक देत राज्यभरातून व परराज्यातून आलेल्या 6 लाखांहून अधिक वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रा एकादशी साजरी करून परतीचा प्रवास सुरू केला आहे. वारकऱ्यांच्या गर्दीने पंढरपूर बसस्थानक आणि रेल्वेस्थानक हाऊसफुल्ल झाले आहे.

कार्तिकी वारीसाठी गेली तीन दिवस पंढरपूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. बहुतांश भाविक स्वतःच्या वाहनाने तसेच एसटी बसेस व रेल्वे प्रवास करण्यासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र दिसून येते. दोन वर्षे कोरोनामुळे कार्तिकी यात्रा साजरी होऊ शकली नव्हती. कोरोनाचे संकट कमी झाल्याने निर्बंधमुक्तपणे यात्रा भरविण्यात आली. कार्तिकी एकादशीला विविध संतांच्या पालख्यांबरोबर लाखो भाविक ‘माउली माउली’च्या जयघोषात पंढरीत आले होते. दिंडय़ा संस्थांनच्या मठात विसावल्या, तर लहानसहान दिंडय़ा घेऊन आलेले भाविक 65 एकर येथील भक्तीसागर, रेल्वे मैदान, उपनगरीय भागात तंबू, राहुटय़ा उभारून विसावले होते. दोन वर्षांनंतर कार्तिकी यात्रा भरत असल्याने 6 लाखांपेक्षा जास्त भाविक आले होते. भाविकांची संख्या वाढल्याने छोटे-मोठे व्यापारी, स्टॉलधारक, फेरीवाले यांनी दुकाने थाटली होती. प्रासादिक साहित्यासह, खेळणी, कृषी साहित्य, कपडे, संसारोपयोगी साहित्याच्या दुकानांची गर्दी होती.

राज्य परिवहन महामंडळाकडून पंढरपूर शहराबाहेर चार ठिकाणी तात्पुरती बसस्थानके उभारली आहेत. या चार बसस्थानकावरून नियोजन केल्याप्रमाणे 1599 जादा बसेसद्वारे भाविकांना सेवा देण्यात येत आहे, तर मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानेदेखील यात्रेकरिता विशेष जादा गाडय़ा सोडून भाविकांची सोय केलेली आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन व बसस्थानक येथे भाविक गर्दी करताना दिसत आहेत.

पिकांच्या नुकसानीमुळे द्वादशीलाच परतीचा प्रवास

परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केलेले आहे. याचाही परिणाम यात्रेवर झाला आहे. त्यामुळे भाविकांनी एकादशी साजरी करून लगेच परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. जिह्यातील भाविक एकादशी दिवशीच माघारी परतले, तर राज्यभरातून आलेले भाविक द्वादशीला माघारी परतू लागले आहेत. भाविकांनी परतीचा प्रवास सुरू केल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यांचेही चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *