‘विरोधकांना धडकी भरलीय, आता आम्ही काही घाबरत नाही’; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ नोव्हेंबर । महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे व घरोघरी जावे, असा आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला. तसेच गेल्या चार-पाच दिवसांत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा मतदारसंघ निहाय तयारीचा आढावा घेण्यासही सुरुवात केली आहे.

राज्यात अस्थिर राजकीय परिस्थिती असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. गुजरातमध्येही त्यांनी मोठे प्रकल्प व गुंतवणुकीच्या घोषणा केल्या व निवडणुका जाहीर झाल्या. राज्यातील सरकारमध्ये अस्थिरता असून काही आमदार नाराज असून फुटण्याचा विचार करीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही काळाने अपेक्षित आहे. या पाश्र्वभूमीवर मध्यावधी निवडणुकांची शक्यता उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझा पाठीशी जनता आहे. तसेच ३ महिन्यात मोठ्या संख्येने आम्ही ग्रामपंचायतींवर विजय मिळवला. त्यामुळे विरोधकांना आता धडकी बसली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मध्यावधी निवडणुकीचे लॉजिक काय? त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. मात्र आता आम्ही काही घाबरत नाही, असं विधानही एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

https://twitter.com/i/broadcasts/1OyKAVzjbLOGb

दरम्यान, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी आम्ही हे पाऊल उचललं. तसेच आपल्याला नाव देखील ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असं मिळालं. काही लोकांना वाटले, याचे काही खरे नाही. मात्र मी लढलो आणि जिंकलो. मला जी जबाबदारी मिळाली आहे, त्याचे सोने करण्याचे काम हा एकनाथ शिंदे करणार, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

ईश्वराचे नाव घ्या नाही तर आणखी कोणाचे, मुंबई महानगरपालिकेवरचा शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भगवा उतरविणे कोणाच्या बापास जमणार नाही. शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह गोठवून घेण्याचे पाप सध्याच्या कंस मामांनी केले. ईश्वराने नव्हे! ईश्वराचे वरदान शिवसेनेस (उद्धव बाळासाहेब ठाकरे) लाभले आहे. त्यामुळे हाती मशाल घेऊन शिवसेना तुमच्या छाताडावर पाय देऊन उभीच राहील.

मिंधे गटाचा पाळणा कितीही हलवला तरी तो रिकामाच राहील व कोणत्याही वेळी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची घोषणा होईल, अशा हालचाली राजकीय भूगर्भात सुरू आहेत याची मिंधे गटास कल्पना नाही. आम्ही मात्र कोणत्याही मैदानात उतरून आव्हानांचे घाव परतवून लावण्यास तयार आहोत, असा इशारा आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *