…तर टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एक ओव्हरही न खेळता फायनलमध्ये जाणार, जाणून घ्या गणित

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ नोव्हेंबर । ऑस्ट्रेलियात सुरु असलेली टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ग्रुप १ मधून न्यूझीलंड आणि इंग्लंडची टीम सेमी फायनलमध्ये मध्ये पोहोचली आहे. ग्रुप २ मधून भारत आणि पाकिस्तान सेमी फायनलमध्ये दाखल झाला आहे. ग्रुप १ मध्ये न्यूझीलंड तर ग्रुप २ मध्ये भारत पहिल्या स्थानी आहे. त्यामुळं न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान, भारत विरुद्ध इग्लंड अशा लढती सेमी फायनलमध्ये होतील. सध्या सुरु असलेल्या स्पर्धेत पावसानं हजेरी लावल्यानं अनेक संघांना फटका बसला आहे.पावसाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीच्या नियमानुसार भारत इग्लंडविरुद्ध एक ओव्हरही न खेळता फायनलमध्ये पोहोचू शकतो.

आयसीसीनं पावसाची शक्यता लक्षात घेऊन सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्यांमध्ये एक दिवस राखीव ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला आहे. पावसाची शक्यता लक्षात घेता डकवर्थ लुईस नियम लागू करण्या संदर्भात नियम बदलण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियात जोरदार पाऊस सुरु राहून पहिल्या दिवशी सामना पूर्ण न झाल्यास दुसऱ्या दिवशी खेळवला जाईल. दुसऱ्या म्हणजेच राखीव दिवशी पावसानं खेळ न होऊ शकल्यास आणि डकवर्थ लुईस नियम लागू होत नसल्यास ग्रुप स्टेजला जो संघ पहिल्या स्थानी आहे त्यांचं फायनलचं तिकिट पक्कं होईल. सध्या ग्रुप १ मध्ये न्यूझीलंड आणि ग्रुप २ मध्ये भारत आहे. त्यामुळं भारत इंग्लंड सामना पावसात वाहून गेल्यास भारताला थेट फायनलचं तिकीट मिळू शकतं. मात्र, क्रिकेट रसिकांनी दोन्ही सेमी फायनल कोणत्याही अडथळ्याशिवाय पार पडाव्यात अशी आशा व्यक्त केलीय.

१०-१० ओव्हर्सचा खेळ झाला तरच डकवर्थ लुईस?
आयसीसीच्या प्रचलित नियमानुसार टी-२० सामन्यात दोन्ही संघ पाच पाच ओव्हर खेळल्यानंतर डकवर्थ लुईस नियम लागू करण्यात येतो. मात्र, टी-२० वर्ल्डकपचं महत्त्व लक्षात घेता नव्या निर्णयानुसार दोन्ही संघांनी १०-१० ओव्हर्स खेळल्या असतील तरच डकवर्थ लुईस नियम लागू केला जाणार आहे.

पावसामुळं टी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना न होऊ शकल्यास दोन्ही टीमला संयुक्त विजेते घोषित केलं जाणार आहे. टी-२० ची पहिली सेमी फायनल सिडनीमध्ये ९ नोव्हेंबरला होईल. दुसरी सेमी फायनल १० नोव्हेंबरला अॅडिलेडमध्ये होईल. तर, फायनल १३ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होणार आहे. पावसाचा फटका आयर्लंड-अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, दक्षिण आफ्रिका-झिम्बाब्वे, न्यूझीलँड-अफगाणिस्तान यांच्या सामन्यांना बसला होता. तर, डकवर्थ लुईस नियमाप्रमाणं इंग्लंड पराभूत झालं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *