![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ नोव्हेंबर । कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पोर्णिमेला शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरू, गुरू नानक यांची जयंती (Guru Nanak Jayanti 2022) साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी आज म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी गुरू नानक जयंती साजरी करण्यात येत आहे. आजचा दिवस शिख समुदायाकडून (Sikh Religion) गुरू पर्व किंवा प्रकाश पर्व (Prakash Parv) म्हणूनही साजरा केला जातो. यंदा गुरू नानक यांची 553 वी जयंती साजरी केली जात आहे.
गुरू नानक यांचा जन्म 1469 साली पंजाब (Punjab) प्रांतातील तलवंडी या ठिकाणी झाला. सध्या हे ठिकाण पाकिस्तामध्ये आहे. नानक लहानपणापासूनच आपला वेळ चिंतनात घालवत असत. त्यांनी कधीही संसारिक गोष्टींचा मोह ठेवला नाही. नानकांचा लहानपणापासूनच अध्यात्म आणि भक्तीकडे ओढा होता. पंजाबी, फारशी आणि अरबी भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतं. वयाच्या 11 व्या वर्षी जनेऊ घालण्याची प्रथा पाळली जात असताना त्यांनी पुराणमतवादाविरोधात संघर्ष सुरू केला.
गुरू नानक यांनी देशभर प्रवास केला. सन 1521 पर्यंत त्यांनी भारत, अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांतील प्रमुख स्थांनांना भेटी दिल्या. गुरू नानक हे सर्वेश्वरवादी होते. त्यांनी त्यांच्या उदारमतवादी दृष्टिकोनाने सर्व धर्मातील चांगुलपणा आत्मसात केला. देव एक आहे, हिंदू मुस्लिम सर्व एकाच देवाची मुले आहेत अशी त्यांची शिकवण होती. देवाच्या समोर सर्व लोक समान आहेत असं ते म्हणायचे. गुरू नानक यांनी रचलेल्या कविता नंतर शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरू ग्रंथ साहिब’मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
गुरू नानक यांनी आपलं संपूर्ण जीवन हे मानवी कल्याणासाठी समर्पित केलं. प्रेम, सेवा, परोपकार, मानवतावाद, समता, बंधुता आणि परोपकार या गोष्टी त्यांनी शिकवणीतून दिल्या. याच मूल्यांवर आधारित त्यांनी शिख धर्माची स्थापना केली आणि त्या माध्यमातून समाजातील चुकीच्या प्रथा, अंधश्रद्धा दुर करण्याचा प्रयत्न केला.
गुरू नानक यांनी त्यांचे शिष्य आणि भाऊ लहाना यांना आपला उत्तराधिकारी निवडलं. नंतर त्यांनाच गुरू अंगद देव म्हणून ओळखलं गेलं.
गुरू नानक साहेब यांचे 22 सप्टेंबर 1539 रोजी निधन झालं. सध्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या कर्तारपूर या ठिकाणी त्यांचे निधन झाले. हे ठिकाण शिख समुदायासाठी अत्यंत पवित्र असून ते आता डेरा बाबा नानक या नावाने ओळखलं जातं.