राज्याच्या पहिल्या महिला CM कोणी व्हावं? अंधारेंनी या २ महिला नेत्यांची थेट नावे सांगितली !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ नोव्हेंबर । शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफे या कार्यक्रमात विविध मुद्यांवर भाष्य केलं. राजकारणातील महिलांची स्थिती, सध्या राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या महिला नेत्यांबद्दल वापरली जाणारी आक्षेपार्ह भाषा, भाजपचं राजकारण, राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्या संदर्भातील प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण असावं, असं विचारलं असता सुषमा अंधारे यांनी राज्यातील तीन महिला नेत्यांची नावं सांगितली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, भाजपच्या पंकजा मुंडे आणि शिवसेना नेत्या निलमताई गोऱ्हे यांच्या नावांचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी
केला. मात्र, त्यात पहिलं नाव त्यांनी सुप्रिया सुळे यांचं घेतलं.

पुरोगामी महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकर यांचा महाराष्ट्र असं म्हटलं जात असलं तरी कर्मठ म्हणवल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात पहिली महिला मुख्यमंत्री झाली. परंतु, महाराष्ट्रात अजूनही महिला मुख्यमंत्रिपदावर बसलेली नाही. याच कारण इथल्या राजकारणावरील सरंजामी मानसिकता असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या. शिवसेनेत महिला आणि पुरुष असा भेद नाही. शिवसेनेत शिवसैनिक असतं, इथं भेदभाव केला जात नाही, असं त्या म्हणाल्या.

सुप्रिया सुळे या कित्येकवेळा संसदरत्न झालेल्या आहेत, त्यांचा प्रचंड अभ्यास आहे. पक्षीय राजकारण बाजुला ठेवून महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री कोण असावी, असं विचारलं तर माझं उत्तर सुप्रिया सुळे हे असेल, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. सगळ्या अर्थानं त्यांची संवेदनशील, अभ्यासू, सुसंस्कृतपणा आणि मोजकं मार्मिकपणे मांडण्याची पद्धत असेल. गेल्या सात आठ वर्षांपूर्वी माझ्यावर हल्ला झाला होता. त्यावेळी मी त्यांची टीकाकार होते तरी देखील त्यांनी माझी विचारपूस केली होती. राज्यात सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे यांच्यासारखी नावं आहेत. शिवसेनेतील निलमताई गोऱ्हे यांचं नाव असेल, असं सुषमा अंधारे यांनी सांगितलं. मात्र, पक्षीय राजकारण बाजूला ठेऊन सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे ही नावं महत्त्वाची वाटतात,असं त्या म्हणाल्या.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *