महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – : कोरोनाव्हायरसविरोधात जगभरात लस विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यात आता एका वेगळ्या पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या लसीचं ह्ययुमन ट्रायल सुरू झालं आहे. अमेरिकेतील फाइजर आणि जर्मनीतील बायोएनटेक या कंपन्यांनी एकत्रितरित्या ही लस विकसित केली आहे, ज्याचं सोमवारपासून ह्युमन ट्रायल सुरू करण्यात आलं आहे. जर हे ट्रायल यशस्वी झालं तर ही लस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मेसेंजर RNA या जेनेटिक मटेरियलच्या आधारावर ही लस विकसित करण्यात आली आहे. लस विकसित करण्याचं ही प्रक्रिया पारंपारिक प्रक्रियेपेक्षा वेगळी आणि जलद आहे. पारंपारिक लस बनवण्याच्या प्रक्रियेत कमजोर व्हायरसच्या मदतीनं मानवी शरीरात अँटिबॉडीज तयार केल्या जातात, ज्यामुळे ती शरीरात काम करायला खूप कालावधी जातो.मानवी शरीरातील पेशींना प्रोटिन बनवण्याच्या सूचना देण्याचं काम मेसेंजर RNA चं असतं. विशेष पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या या मेसेंजर RNA ला मानवी शरीरात टाकलं जाईल जेणेकरून ते पेशींना कोरोनाव्हायरससाठी स्पाइक प्रोटिन तयार करण्याच्या सूचना देतील.या प्रक्रियेत कोणती व्यक्ती आजारीही नाही पडणार सामान्यपणे हा व्हायरस या प्रोटिनचा वापर करून फुफ्फुसातील पेशींपर्यंत पोहोचतो. अशात ही लस रोगप्रतिकारक प्रणालीला व्हायरसशी लढण्यासाठी अँटिबॉडी बनवण्याचं काम करेल.
भारतातही 5 लस अंतिम टप्प्यात
कोरोनाव्हायरसविरोधातील लस तयार करण्यासाठी भारतातही काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. देशात 5 वॅक्सिन अंतिम टप्प्यात असून लवकरच त्यांची ट्रायल होणार असल्याची माहिती मिळत आहे. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लस शोधणाऱ्या डॉक्टरांच्या टास्क फोर्ससोबत मंगळवारी बैठक घेतली.या बैठकीत कोरोनावर प्रतिबंध करणारी लस शोधण्याबाबत आढावा घेतला आहे. या व्हायरची लस शोधण्याची मोहीम कुठपर्यंत आली आहे आणि किती वेळ लागू शकतो याबाबतही चर्चा केली. सध्या करोनाविरोधात लढण्यासाठी विविध प्रकारच्या 30 लसींवर काम सुरू आहे.