जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का? अजित पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १४ नोव्हेंबर । राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राजकीय वाद पेटला आहे. आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. पण, आव्हाड यांनी अजिबात राजीनामा देऊ नये, सरकारं येत असतात जात असतात. पण असं डगमगून जायचं नसतं, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठामपणे भूमिका मांडली.

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली आहे. ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे. अजित पवार यांनीही पत्रकार परिषद घेऊन या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. आव्हाड यांनी अजिबात राजीनामा देऊ नये. माझी आव्हाडांना विनंती हे की त्यांनी राजीनामा अजिबात देऊ नये. सरकारं येत असतात जात असतात. पण असं डगमगून जायचं नसतं. मला माहिती हे आव्हाडांना टार्गेट केलं जातंय. जनताच हे सर्व बघतेय. तो व्हिडिओ मी पण पाहिला. ज्येष्ठ नेत्यांना वाट मोकळी करून द्यायची असते तेच त्यांनी केलं. त्यात आव्हाड काहीही चुकीचं वागलेले नाहीत, असं पवार यांनी ठणकावून सांगितलं.

‘तरीही त्यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल होतो हे काय चाललंय. ठीक हे राजकीय मतभेद असू शकतात पण अशा प्रकारे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर लोकच खपवून घेणार नाहीत. दिवस बदलत असतात हे त्यांनीही लक्षात ठेवावं, असा इशाराही पवार यांनी दिला.

‘जर चूक झाली असेल तर नक्कीच कारवाई करा. पण चुकीचे गुन्हे दाखल करून लोकप्रतिनिधींना बदनाम करू नये, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलत असताना रोखठोक प्रतिक्रिया दिली.

विनयभंग हा शब्द वापरला गेला. काल त्या कार्यक्रमामध्ये आव्हाड यांना सांगितलं गेलं की तुमच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होणार होता तो आम्ही वाचवला. व्हिडीओ जर पाहिला तर त्यामध्ये मोठ्या संख्येनं गर्दी झाली होती. ती महिला त्यांच्या समोरून येत होती. यावरून सर्व काही समजून येतं. सकाळपासून गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव सुरू होता. मी काही अपशब्द वापरू शकत नाही. पण, प्लीज अशा पद्धतीने समोरून येऊ नका, अशा शब्दांत ऋता आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली.

काल त्या कार्यक्रमामध्ये आमच्याही अनेक महिला होत्या. गर्दी जास्त झाल्यामुळे त्या सुद्धा खाली पडल्यात मग आता काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करायचा का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

जर तुम्ही म्हणताय आम्हाला स्पर्श केला. मग समोर एवढी गर्दी दिसत आहे, अशा गर्दीत कशाला जात आहात. तिथे फक्त भाजपच्या कार्यकर्त्या होत्या, तिथे दुसरे कुणीही नव्हते, असंही ऋता यांनी ठणकावून सांगितलं.

आता निलमताईंनी समजावून सांगितलं. जे कुणी सत्तेत असेल तर काहीही करू शकता. जर तुम्ही आमच्यासोबत येणार नसेल तर आम्ही तुमच्याविरोधात गुन्हे दाखल केले जाईल, अशी धमकी दिली जात आहे, अशी मोंडस ऑपरेंडी वापरली जात आहे. नवीन काही तयार करायचं आणि त्याबद्दल मीडिया बोलणार, लोक घरातही बोलणार, आता माझा प्रश्न हाच आहे की, असं सगळं होत आहे. त्यांच्या मतदारसंघातील सर्वांचा राजीनामा देण्यासाठी विरोध आहे. न्यायालयात लढा दिला पाहिजे, त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, असंही ऋता आव्हाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *