जितेंद्र आव्हाडांचा राजीनामा स्वीकारणार का ? विधानसभा अध्यक्ष नार्वेकर म्हणाले …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ नोव्हेंबर । राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय दंड विधानातील ३५४ कलमांतर्गत त्यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्रही त्यांनी विधानसभा अध्यक्षांच्या नावे लिहिले आहे. दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आव्हाडांच्या राजीनाम्यावर भाष्य केले आहे. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

राजीनामा स्वीकारणार का?
आतापर्यंत माझ्याकडे जितेंद्र आव्हाड किंवा इतर कोणत्याही विधिमंडळ सदस्याचा राजीनामा आलेला नाही. एखाद्या आमादाराला राजीनामा द्यायचा असेल तर तो विधिमंडळ अध्यक्षांना दिला जातो. ते मागील १५ ते २० वर्षे विधिमंडळात काम करत आहेत. त्यामुळे राजीनामा द्यायचा असेल तर तो कोणाकडे द्यायचा, याची त्यांना पूर्णपणे कल्पना आहे. राजीनामा स्वीकारण्यापूर्वी पडताळणी करावी लागते. राजीनामा देण्याची कार्यपद्धती, नियम असतात. या सर्वांचे पालन झाले आहे का? हे पाहावे लागते. ही सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर राजीनामा स्वीकारायचा की नाही, हे ठरवले जाते, अशी माहिती नार्वेकर यांनी दिली.

एखाद्या बाबीची चौकशी सुरू असेल, तर यंत्रणांना त्यांचे काम करण्याची संधी द्यावी. एखादी व्यक्ती निर्दोष असेल तर तिच्यावर कोणताही अन्याय होणार नाही. सर्वांसाठी कायदा समान आहे, असेही राहुल नार्वेकर म्हणाले.

एखाद्या सदस्यावर कोणतीही फौजदारी कारवाई करायची असेल किंवा त्या सदस्याला अटक केली जात असेल तर संबंधित माहिती विधिमंडळ अध्यक्षाला दिली जाते. विधिमंडळ सदस्यांचे अधिकार अबाधित ठेवण्याची जबादारी विधिमंडळ अध्यक्षांची आहे. ती आम्ही पार पाडू, असे आश्वासनही राहुल नार्वेकर यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *