महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ नोव्हेंबर । शिवसेनेतील फुटीनंतर ठाण्यातील राजकीय संघर्ष आता हिंसक होताना दिसत आहे. काल ठाण्यातील किसननगर येथे उद्धव ठाकरे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी घुसखोरी करत ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली.
घटनास्थळी ठाकरे गटाचे खासदार राजन विचारेही उपस्थित होते. यावेळी त्यांनाही धक्काबुक्की झाल्याचे दिसत आहे. ही मारहाण कॅमेऱ्यांतही कैद झाली आहे. काल मध्यरात्री ही घटना घडली. शिंदे गटाचे कार्यकर्ते योगेश जानकर व इतरांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. घटना घडली त्या किसन नगर परिसरात मुख्यमंत्री शिंदे यांचे प्राबल्य आहे.
कार्यकर्ता रुग्णालयात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगांवकर यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीत कार्यकर्ता जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर दोन्ही गट येथीळ श्रीनगर पोलिस स्टेशनसमोरही आमने-सामने आले.
मारहाणीनंतर ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे आणि इतर वरिष्ठ पदाधिकारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार देण्यासाठी श्रीनगर पोलिस ठाण्यात गेले होते. मात्र, तेथे शिंदे गटाचेही कार्यकर्ते दाखल झाल्याने पुन्हा दोन्ही गट आमने-सामने आले. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून राजन विचारे, केदार दिघे आणि ठाकरे गटाच्या इतर नेत्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
पोलिसांचा लाठीचार्ज
ठाकरे गटाचे नेते श्रीनगर पोलिस ठाण्यात असतानाच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी बाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, पोलिस ठाण्याला घेराव घालण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे परिस्थिती चिघळू नये, यासाठी पोलिसांनी खासदार राजन विचारेंसह ठाकरे गटाच्या नेत्यांना कडेकोट बंदोबस्तात बाहेर काढले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही करण्यात आला.
घटनेनंतर आरोप-प्रत्यारोप
मारहाणीच्या घटनेनंतर दोन्ही गटांनी परस्परांवर आरोप केले आहेत. ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले की, काल किसननगर येथे ठाकरे गटाचा मेळावा सुरू असतानाच शिंदे गटाचे कार्यकर्त्यांनी एकदम घुसखोरी करत आमच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यासाठी बाहेरील जिल्ह्यातून 100 माणसं आणली होती. ठाकरे गटावर दबाव टाकण्यासाठीच असा प्रयत्न केला जात आहे.
तर, शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सांगितले की, काल किसननगर येथे एका वाढदिवसाच्या कार्यक्रमातून आमच्या नगरसेवकाला खासदार राजन विचारे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाकलून लावले. वाढदिवस सुरू असतानाच आमच्या नगरसेवकाला तु इथे कशाला आलास? असे विचारत त्याला धक्काबुक्की करत बाहेर काढले. त्यामुळे नंतर वाद झाला. याची सुरूवात ठाकरे गटानेच केली.