“शिवसैनिकांचं रक्त सांडणार असाल तर…”; ठाण्यातील राड्यानंतर संजय राऊतांचा शिंदे गटाला इशारा!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १५ नोव्हेंबर । शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी आज(मंगळवार) प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाण्यात शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेवरही प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, “असे प्रकार नारायण राणे सोडून गेले त्या जिल्ह्यातही झाले होते. आज ते कुठे आहेत?, आज तिथे शिवसेना आहे. ठाण्यात सुद्धा आज आपल्याकडे सत्ता आहे, पोलीस यंत्रणा आपल्याकडे आहे, ताकद आहे पैशांची आणि म्हणून शिवसैनिकांवर जर हल्ले आपण करणार असाल, शिवसैनिकांचं रक्त सांडणार असाल तर शिवसैनिकांचं रक्त इतकं स्वस्त नाही, हे लक्षात घ्या.”

याशिवाय “शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या ५० वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आहे. ज्यांनी शिवसैनिकाचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केला, ते राजकारणातून, समाजकारणातून आणि जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले. त्यांचं भविष्यात फारकाही चांगलं झालं नाही.” असंही संजय राऊतांनी यावेळी म्हटलं.

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील किसननगर भागात ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादानंतर दोन्ही गटांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या. त्यामुळे दोन्ही गटांविरोधात परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राडा झाला त्यावेळेस ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, शिवसेनेने दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे हे देखील उपस्थित होते. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना बाहेर काढले. श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेरही दोन्ही गट समोरासमोर आल्याने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठीमारही केला. घटनेनंतर ठाकरे गटाकडून समाजमाध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यात गुंडाराज सुरू आहे का? असा आरोप ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *