महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १६ नोव्हेंबर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन देशातील तरुणांनी देऊन त्यांची फसवणूक केली. मोदी सत्तेत येऊन 8 वर्षे झाली नोकऱ्या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून व नोटबंदीने व्यापार उद्योग बंद पाडून कोट्यवधी लोकांचे रोजगार घालवले. देशातील तरुणांचे स्वप्न भंग केले, देशातील तरुण मोदींना नोकऱ्या कुठे आहेत? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे. बेरोजगारी सारख्या प्रश्नावर मोदी गप्प आहेत असा हल्लाबोलही त्यांनी केला.
वाशिमच्या चौक सभेला जमलेल्या हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना राहुल गांधी यांनी भाजप व मोदी सरकारवर तुफान टीका केली. ते म्हणाले की देशाचा कणा असलेला लघु, मध्यम, छोटे व्यापार दुकानदार यांचे व्यवसाय बंद पडले, लाखो रोजगार गेले. दोन तीन उद्योगपतींसाठी मोदी सरकार काम करत आहे. सामान्य जनतेसाठी नाही. महागाई, बेरोजगारी संपवण्यासाठी मोदी सरकार काहीही करत नाही. गॅस 400 रुपये, पेट्रोल 70 रुपये व डिझेल 60 रुपये असताना नरेंद्र मोदी यूपीए सरकारवर कठोर टीका करत होते. आता गॅस 1200 रुपये, पेट्रोल 109 रुपये व डिझेल 96 रुपये झाले तरी नरेंद्र मोदी एक शब्दही उच्चारत नाहीत. सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी यांचे मोदी सरकारला काहीही देणेघेणे नाही.
यूपीए सरकारने शेतक-यांचे कर्जमाफ केले पण मोदी सरकार शेतक-यांची कर्जमाफी करत नाही. बडया उद्योगपतींची लाखो कोटी रुपयांची कर्ज एनपीएच्या नावाखाली मात्र माफ केली जातात आणि शेतकऱ्यांना लाख दोन लाख कर्जासाठी त्रास दिला जातो. शेतमालाला एमएसपी मिळत नाही. तरुण शिक्षण घेऊन नोकरीचे स्वप्न पाहत आहे पण त्यांना नोकरी मिळत नाही. देशात हिंसा, द्वेष पसरवून समाजा- समाजात, जाती धर्मात भांडणे लावली जात आहेत. हा देश एकसंध रहावा, संविधान वाचावे, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडावी यासाठीच ही भारत जोडो यात्रा आहे, असेही राहुल गांधी म्हणाले.