महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांना जाज्वल्य अभिमान होता, त्यांच्याबद्दल कोणी चुकीचे बोलले तर त्याला शब्दातून आणि कृतीतूनही चोख उत्तर देत. मात्र, ज्या सावरकरांबद्दल राहुल गांधी इतके नीच बोलतात, त्यांच्या गळ्यात गळा टाकून आदित्य ठाकरे पदयात्रा करतात, याचे वाईट वाटते. सावरकरांना शिव्या देणाऱ्यांना तुम्ही जवळ करत असाल, तर बाळासाहेबांशी नाते सांगण्याचा तुम्हाला अधिकार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
गुरुवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असून, एकाच दिवशी शिवसेनेच्या दोन्ही गटांत त्यावरून संघर्ष नको म्हणून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून ‘वारसा विचारांचा’ या परिसंवादाचे आयोजन बुधवारीच करण्यात आले. शिवसेनाप्रमुखांना आदरांजली अर्पण करणाऱ्या या सोहळ्याला उपस्थित राहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे गटाला मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सर्व मंत्री, नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.