Shraddha Murder Case : आफताब कोर्टात हजर ; नार्को टेस्टला मंजुरी, पोलीस कोठडीही वाढली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । मुंबईच्या कॉल सेंटरमध्ये दोघांची मैत्री झाली. त्यानंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रेमात इतके अडकले की, घरच्यांनी विरोध केल्यावर ते दिल्लीला पळून गेले, पण एके दिवशी भांडण झाले आणि मुलाने मुलीच्या शरीराचे 35 तुकडे केले. हत्येची ही खळबळजनक घटना दिल्लीतील मेहरौली परिसरातून समोर आली आहे. हत्येची ही कहाणी 6 महिन्यांपूर्वीची आहे आणि यामध्ये आफताब असे आरोपी मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. श्रद्धा हत्याप्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

श्रद्धा हत्याकांडातील मुख्य आरोपी आफताबला आज दिल्ली कोर्टात हजर करण्यात आले. याच दरम्यान वकिलांनी दिल्ली कोर्टाबाहेर गोंधळ घातला. वकिलांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. वकिलांनी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “श्रद्धाचा मारेकरी असलेल्या आफताबला फाशी द्या” अशी जोरदार घोषणाबाजी देखील केली. कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे. तसेच दिल्ली पोलिसांनीही नार्को टेस्टला मान्यता दिली आहे. आफताबनेही नार्को टेस्ट करण्यास संमती दिली. दिल्ली पोलिसांना आफताबला उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात घेऊन जायचे आहे. श्रद्धा आणि आफताब हे दोघं या दोन्ही ठिकाणी गेले होते.

आफताबवर त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून करण्याचा आणि त्यानंतर तिच्या शरीराचे 35 तुकडे केल्याचा आरोप आहे. पोलिसांना अद्याप श्रद्धाचं शिर, मोबाईल आणि हत्येत वापरलेले हत्यार सापडलेले नाही. पोलीस त्यांचा सातत्याने शोध घेत आहेत. आफताब सतत आपली विधानं बदलत असतो. आफताबने एकदा पोलिसांना सांगितले की, श्रद्धा त्याच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणत होती, म्हणून त्याने तिची हत्या केली. कधी कधी आफताबने सांगितले की, जेव्हा तो कुणाशी फोनवर बोलत असे, तेव्हा श्रद्धा त्याच्यावर संशय घेत असे, यावरून दोघांमध्ये भांडणही व्हायचे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

आफताबचा जेलमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आफताब जेलमध्ये असून त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात दरम्यान त्याचा जेलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात आफताबची चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात कोणताच खेद जाणवला नाही. त्याला या गोष्टीचा पश्चाताप देखील नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी अटक केल्यावर आफताब एकदाच रडला. आफताबचे वडील अमीन पुनावाला कोठडीत त्याची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आफताबच्या डोळ्यात अश्रू होते अशी माहिती समोर आली आहे.

श्रद्धा वालकरच्या वडिलांनी आरोपी आफताबचा कबुली जबाब ऐकणं आपल्यासाठी फार अवघड असल्याचं म्हटलं आहे. मी स्तब्ध झालो होतो. घटनेचा सगळा तपशील ऐकणं माझ्यासाठी फार कठीण असल्याचं सांगितलं. तसेच आफताबला फाशीची शिक्षा दिली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. NDTV च्या एका रिपोर्टनुसार, श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी “त्याने माझ्यासमोरच कबुली जबाब दिला. पोलिसांना त्याला तू यांना ओळखतो का?’ अशी विचारणा केली. यावर त्याने हे श्रद्धाचे वडील आहेत असं सांगितलं. यानंतर त्याने श्रद्धा आता जिवंत नसल्याची माहिती देत घटनाक्रम सांगितला आणि मी तिथेच खाली कोसळलो. मला ते ऐकवलं जात नव्हतं. यानंतर पोलिसांनी त्याला बाजूला नेलं. मी ऐकण्याच्या स्थितीत नव्हतो” असं सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *