Nitin Gadkari: भाषण सुरु असताना गडकरींची तब्येत बिघडली ; डॉक्टर तातडीने कार्यक्रमस्थळी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १७ नोव्हेंबर । केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी हे पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमात असताना त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सिलिगुडी येथे एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांचे भाषण सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी भाषण सुरु असताना नितीन गडकरी यांना भोवळ आली. त्यामुळे नितीन गडकरी (Nitin Gadkari) व्यासपीठावरील खुर्चीवर जाऊन बसले. त्यानंतर गडकरी यांना तातडीने व्यासपीठावरून खाली नेण्यात आले. नजीकच्या रुग्णालयातील डॉक्टरांना याठिकाणी पाचारण करुन नितीन गडकरी यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती आहे. शरीरातील साखरेची पातळी (Sugar Level) कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितले.

या सगळ्यानंतर नितीन गडकरी यांना भाजपचे स्थानिक खासदार राजू बिस्टा यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. त्यानंतर नितीन गडकरी यांना बरे वाटू लागले. आता त्यांना लवकरच दिल्लीला नेण्यात येईल. दरम्यान, सिलीगुडीच्या आयुक्तांनी गडकरींवर उपचार करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

शिमल्यात गडकरींना भोवळ; प्रकृती स्थिर

यापूर्वीही काहीवेळा नितीन गडकरी यांची तब्येत बिघडल्याचे प्रकार घडले होते. सप्टेंबर २०१८ मध्ये अहमदनगर येथील कार्यक्रमात नितीन गडकरी कार्यक्रमादरम्यान बेशुद्ध पडले होते.यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव उपस्थित होते. राज्यपालांनीच त्यांना मंचावर आधार दिला. यानंतर नितीन गडकरी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तर २०१० साली जंतरमंतरवरील कार्यक्रमातही गडकरी यांना चक्कर आली होती.

वजन कमी करण्यासाठी सर्जरी

नितीन गडकरी यांच्यावर मधूमेह आणि वजन कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी शस्त्रक्रिया झाली होती. सप्टेंबर २०११ साली त्यांच्यावर बॅरिएट्रिक सर्जरी करण्यात आली होती. पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सरकारी योजनांचं उद्घाटन करण्यासाठी नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी सिलीगुडीमध्ये १२०६ कोटी रुपये खर्चाच्या तीन राष्ट्रीय महामार्गांच्याप्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. हा कार्यक्रम सुरु असतानाच त्यांची प्रकृती अचानक बिघडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *