सावरकरांविरुद्ध वक्तव्य राहुल गांधींना पडलं महागात, ठाण्यात शिंदे गटाने उचललं मोठं पाऊल…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । स्वातंत्रवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केल्या प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात बाळासाहेबांची शिवसेनाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे भविष्यात राहील गांधीचे हे वक्तव्य महागात पडण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

सध्या राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा आता महाराष्ट्रात आलेली आहे. मात्र, या यात्रेदरम्यान सभेत राहुल गांधी यांनी सावरकरांची बदनामी करणारे वक्तव्य केले आहे. या वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यात केला जात आहे. या वक्तव्याचा निषेधार्थ ठाण्यात काल गुरुवारी ठाण्यातील बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना या शिंदेगताच्या महिला आघाडी प्रमुख वंदना सुहास डोंगरे यांनी ठाण्यातील ठाणे नगर पोलीस ठाण्यात राहुल गांधी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी करणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राच्या मातीमध्ये आमच्या महापुरुषांची बदनामी सहन करणार नाही असा पवित्रा वंदना डोंगरे यांनी घेतला असून बाळासाहेबांची शिवसेना पक्षानेदेखील यासाठी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. पोलिसांनी राहूल गांधी यांच्या या वक्तव्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के यांनीही आज मोर्चा दरम्यान केली होती. त्यानंतर संध्याकाळी राहुल गांधी यांच्या विरोधात हा अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत पोलीस नक्की काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.

याआधी देखील राहुल गांधी यांच्या विरोधात ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गुन्हा दाखल आहे. याआधी ठाण्यातील भिवंडी परिसरात आयोजित प्रचार सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केलेल्या वक्तव्याचा विरोधात राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार भिवंडीमध्ये या गुन्हा प्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *