पुढील चार दिवसांत राज्यात ‘हुडहुडी’ वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । उत्तरेकडे बर्फवृष्टीच्या परिणामांचे पडसाद राज्यातही उमटत असून, किमान तापमानाचा पारा खाली घसरला आहे. राज्यातील किमान तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. पुढील चार दिवस थंडीत अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये सांताक्रूझ येथे गुरुवारी किमान तापमानात झालेली घट जाणवली, तर कमाल तापमानाचा पारा मात्र चढल्याचे निदर्शनास आले.

मुंबईत बुधवारी कुलाबा येथे २३.४ तर सांताक्रूझ येथे २१.४ अंश सेल्सिअस किमान तापमान होते. कुलाबा येथे गुरुवारी २३.६ तर सांताक्रूझ येथे २०.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ येथे २४ तासांमध्ये एका अंशांने पारा खाली आला. रत्नागिरी, हर्णे येथेही किमान तापमानात एका अंशाची घसरण झाली. गुरुवारी पहाटे कोल्हापूर येथे २.१, सांगली २.२, सातारा २.४ तर सोलापूकर येथे १.१ अंश सेल्सिअसने तापमान घसरण नोंदली गेली. मराठवाडा २४ तासांमध्ये किमान तापमानात मोठा फरक झालेला नसला तरी किमान तापमानाचा पारा सरासरीपेक्षा औरंगाबाद, परभणी येथे २ अंशांनी उतरलेला आहे. विदर्भामध्येही बहुतांश केंद्रांवर किमान तापमानात घसरण झालेली आहे. यवतमाळ येथे गुरुवारी किमान तापमान सरासरीहून ४.४ अंशांनी उतरलेले होते. अमरावती येथे किमान तापमान सरासरीपेक्षा ३.६ अंशांनी उतरलेले होते. गोंदिया येथे २.८ तर वर्धा येथे २.४ अंशांनी सरासरीपेक्षा किमान तापमान उतरले होते. राज्यभरात ही तापमान घसरण जाणवत असून राज्याच्या अंतर्भागात हे प्रमाण अधिक जाणवत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, नाशिक आणि लगतच्या भागांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये १२ अंश सेल्सिअसच्या आसपास किमान तापमानाचा पारा असू शकेल, असा अंदाज आहे. या भागामध्ये सध्या पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव आहे. पूर्वानुमानानुसार येत्या चार आठवड्यांमध्ये मध्य भारतात किमान तापमान हे सरासरीहून कमी राहील अशीही शक्यता आहे. पश्चिम प्रकोपामुळे लडाख, काश्मीर, हिमाचल प्रदेश, येथे पुढील दोन दिवस बर्फवृष्टीची शक्यता आहे. याचा परिणाम किमान तापमानावर होत आहे.

मुंबई कमाल तापमानामध्ये २४ तासांमध्ये वाढ झाली आहे. केवळ मुंबईच नाही तर कोकण किनारपट्टीवरील कमाल तापमानात २४ तासांत वाढ नोंदली गेली. कुलाबा येथे १.६, सांताक्रूझ येथे १.२, हर्णे येथे २.६ तर अलिबाग येथे तब्बल ४.९ अंशांची वाढ केवळ २४ तासांमध्ये नोंदली गेली.

कमाल तापमानात वाढ

एकीकडे राज्यात किमान तापमानात घट झाली, तर कमाल तापमानात मात्र एक ते दीड अंशांची वाढ संभवित असल्याची माहिती हवामान विभागाचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी दिली. दुपारचे वातावरण ऊबदार जाणव्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला. मात्र राज्यात पावसाची शक्यता नसल्याची व धुके, दवीकरण याचाही शक्यता कमी असल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *