‘गावी जाऊ इच्छिणाऱ्या, अडकलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी मोफत होणार’

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – राज्य सरकारच्या निर्णयामुळे तब्बल ४१ दिवसानंतर मजुरांचा स्वगृही जाण्याचा मार्ग सुकर झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव झळकत होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर विविध राज्यातील मजूर राज्यातील विविध भागात अडकलेले होते. आता अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे मजूर गावी जाताना दिसत आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांत किंवा इतर राज्यात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. ई-पास किंवा पोलीस परवानगी मिळविण्यासाठी कोविड १९ ची लक्षणे नसलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र, ही तपासणी मोफत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून स्पष्ट करण्यात आले आहे.

लॉकडाऊन आणि संचारबंदीमुळे विविध राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार, विद्यार्थी आणि पर्यटक अनेक ठिकाणी अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शिथिलता दिल्यानंतर या सर्वच नागरिकांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात येत आहे. त्यासाठी, रेल्वे, बस आणि खासगी वाहनांने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. परराज्यातील मजूरांना स्पेशळ श्रमिक ट्रेनच्या सहाय्याने राज्य सरकारने त्यांच्या राज्यात पाठविण्यात सुरुवात केली आहे. तर, जिल्ह्यांतर्गत ही स्थलांतरीतांची घरवापसी होत आहे. मात्र, या सर्वांना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे.

”लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापुर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे”, असे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी एक रुपयाही देण्याची गरज नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यायला हवं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *