![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १८ नोव्हेंबर । पहाटेपासून वन विभागाकडून सिंहगडावरील अतिक्रमण कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. अतिक्रमण कारवाईसाठी सुमारे सत्तर वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तैनात असून कायदा सुव्यवस्था टिकविण्यासाठी सात वरिष्ठ पोलीस अधिकारी व पंचावन्न पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
सिंहगडावरील खाद्यपदार्थ विक्रेते व इतर व्यावसायिकांना वन विभागाने बैठक घेऊन तसेच नोटीस देऊन अतिक्रमणे काढून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरीही प्रतिसाद न मिळाल्याने वन विभागाने अखेर कारवाईचा बडगा उगारला आहे. कारवाईबाबत वन विभागाने अत्यंत गोपनीयता बाळगली होती. पहाटे पाच वाजताच वन विभागाचे अधिकारी,कर्मचारी व पोलीस कारवाईसाठी दाखल झाले आहेत.
कारवाईदरम्यान 71 नोंदणीकृत व्यावसायिकांचे शेड व 64 नोंदणी नसलेल्या व्यावसायिकांचे शेड असे एकूण 135 शेड जमिनदोस्त करण्यात येणार आहेत. दरम्यान कारवाईला काही व्यावसायिकांचा विरोध असल्याने अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभाग व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे.