महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २१ नोव्हेंबर । मागच्या चार महिन्यांपासून पावसाने थैमान घातल्यानंतर काही अंशी वातावरणात गारवा येत आहे. मागच्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीचा कडाका काहीसा वाढला आहे. कोकण वगळता उर्वरित राज्यात बहुतांश भागात किमान तापमानात 15 अंशांच्या खाली नोंद झाली आहे.
राज्यात औरंगाबादचा पारा घसरला आहे. औरंगाबादमधील तापमान 9.2 अंशावर आले आहे. यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात थंडीची लाट नागरिक शेकोट्यांचा आधार घेतायेत.
विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त थंडी अनुभवायला मिळत आहे. रब्बी पिकांना शेतकरी पाणी भरत असल्यामुळे ही थंडीची लाट अजून जास्त ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते. तर याबरोबरच महाबळेश्वरपेक्षाही नाशकात पारा घसरला आहे. ओझरमध्ये सर्वात कमी 6 अंश सेल्सियसची नोंद करण्यात आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक थंडी नाशिकच्या ओझरमध्ये पाहायला मिळतेय.
ओझरला आज 5.7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. तर निफाडचा पारा 7 अंशावर आहे. नाशिकमध्ये थंडीचा कहर पाहायला मिळतोय. हाडे गोठवणाऱ्या थंडीने नाशिककरांना गारव्याचा फटका बसत आहे. यंदाच्या हंगामातील सर्वात निश्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कडाक्याच्या थंडीने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहे.
दरम्यान, आता मध्य महाराष्ट्रात 22 नोव्हेंबरपर्यंत तीन दिवस कडाक्याची थंडी जाणवणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबरपासून तिसऱ्या आवर्तनाला सुरुवात होऊन थंडी आणखी वाढेल. अशी माहिती हवामानतज्ज्ञांनी दिली आहे.