महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ नोव्हेंबर । जिल्ह्यातील कन्नड येथील एका कार्यक्रमात भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. सध्या राज्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. एका रात्रीतून अशी जादु झाली की सरकार गेलं. आता पुढच्या दोन महिन्यात काय होईल सांगता येत नाही, असे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील विविध शेतीपूरक प्रकल्पाचा शुभारंभ आणि दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमांसाठी मंत्री दानवे यांची प्रमुख उपस्थितीत होती. यावेळी मंत्री दानवे यांनी संवाद साधला. त्यांनी कार्यकर्त्यांसह राजकारण्यांना धारेवर धरलं. राजकारणात तुमच्या अंगात किती सोने असेल, पण तुमच्यासोबत लोक नसतील तर तुम्हाला काहीच किंमत नाही. यासाठी राजकारण करायचं असेल, तर तुमच्यासोबत लोक पाहिजेत, असं दानवे यांनी खडसावलं.
तत्कालीन युतीबाबतही दोनवे बोलले. भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बंद दाराआड चर्चा झाल्यानंतरच शिवसेना-भाजप युतीत लोकसभा, विधानसभा निवडणुका झाल्या. निकाल लागल्यानंतर आपल्याशिवाय भाजप राज्यात सरकार बनवू शकत नाही, असं लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपला सोडून महाविकास आघाडी केली, अशी टीका दानवे यांनी शिवसेनेवर केली. यावेळी माजी आमदार नितीन पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष विजय औताडे, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव, युवा उद्योजक मनोज पवार, हतनूर गटाचे जिल्हा परिषद सदस्य किशोर पवार, जेहूर जिल्हा परिषद गटाचे सदस्य सुरेश गुजराणे, माजी उपसभापती सुनील निकम, तालुका सरचिटणीस सुभाष काळे, काकासाहेब तायडे, संतोष शिरसाठ, प्रभाकर बागूल, पवन खंडेलवाल, विलास भोजने, रत्नाकर गुजराणे, माधव भोजने, गोविंद भोजने उपस्थित होते.
कुणालाही वाटत नव्हते की महाविकास आघाडी सरकार पडेल. मात्र एक रात्रीतून अशी जादू झाली की, सरकार पडले. येत्या दोन महिन्यात काय होईल हे सांगता येत नाही, असं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं. या विधानानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार पडते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.