Shraddha Murder Case: होय! मीच तिला कायमचं संपवलं; आफताबची न्यायालयात कबुली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ नोव्हेंबर । श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याने न्यायालयात आपला गुन्हा कबूल केला आहे. यासोबतच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीदरम्यान आफताबने न्यायाधीशांसमोर सांगितले की, त्याने श्रद्धाची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. यानंतर दिल्लीच्या साकेत न्यायालयाने आफताबच्या पोलीस कोठडीत पुढील 4 दिवसांची वाढ केली आहे.

आफताबची न्यायालयात कबुली
साकेत कोर्टासमोर कबुली देताना आरोपी आफताब पूनावालानं न्यायालयात सांगितलं की, ‘आपण रागाच्या भरात कोणताही विचार न करता हत्या केली. हत्येला सहा महिने झाले असून, काही गोष्टी आपल्याला आठवत नसल्याने पोलिसांना सांगू शकत नसल्याचंही त्याने म्हटलं आहे. तसंच आपण पोलिसांनी तपासात सहकार्य करत असून, यापुढेही करत राहू असं आश्वासन त्याने दिलं आहे.

मैदनगडीच्या तलावातून सापडला मोठा पुरावा
दिल्लीच्या मैदानगडीच्या तलावातून मोठे पुरावे सापडले असून गोताखोरांच्या मदतीने पोलिसांनी हाडे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात पोलिसांना ही हाडे मानवी हाताची असल्याचे समजत आहे. पोलिसांनी सर्व हाडे तपासासाठी सीएफएसएलकडे पाठवली आहेत. पोलिसांना अद्याप कवटी सापडली नसली तरी कवटीचा खालचा भाग म्हणजेच जबडा सापडला आहे, जो तपासासाठी सीएफएसएलकडे पाठवण्यात आला आहे. त्याचवेळी ही कवटी या तलावात असावी असा संशय पोलिसांना असून ही कवटी जप्त करण्यासाठी पोलीस सातत्याने शोध घेत आहेत.

श्रद्धा हत्याकांडात पुढील 100 तास महत्त्वाचे
आरोपी आफताबला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाने 4 दिवसांची कोठडी वाढवली. यानंतर पुढील 100 तास या प्रकरणाच्या तपासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून 100 हून अधिक पोलिसांना अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. आरोपीला कोणत्याही परिस्थितीत कारागृहात पाठवण्यापूर्वी आरोपीला 14 दिवसांची पोलिस कोठडीत ठेवता येते. त्यामुळे पोलिसांकडे आता चार दिवसांचा अवधी आहे.

दिल्ली पोलिसांकडे 4 दिवस आहेत. जे खूप महत्त्वाचे आहेत. यादरम्यान पोलिसांना अनेक महत्त्वाचे पुरावे शोधायचे आहेत. अद्यापपर्यंत घटनेत वापरलेले हत्यार सापडलेले नाही. याशिवाय श्रद्धाच्या डोक्याचा काही भाग सापडलेला नाही आणि शरीराचे इतर महत्त्वाचे भागही सापडलेले नाहीत. या घटनेत सहभागी असलेले कपडेही सापडले नाहीत आणि पोलीस श्रद्धाच्या फोनचाही शोध घेत आहेत.

नार्को चाचणीपूर्वी आफताबची पॉलिग्राफी चाचणी
दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब अमीन पूनावालाची नार्को चाचणी करण्यापूर्वी त्याची पॉलीग्राफी चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडून घेतली आहे. येत्या चार दिवसांत पोलिसांना आफताबची पॉलीग्राफी टेस्ट आणि नार्को टेस्टही करता येणार आहे.

डेटिंग अॅपच्या माध्यमातून भेट, प्रेम आणि नंतर खून
मुंबईतील श्रद्धा आणि आफताबचे प्रेम डेटिंग अॅपवर भेटल्यानंतर सुरू झाले. यानंतर दोघांनी लिव्ह-इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आणि श्रद्धाने तिचे घर सोडले आणि आफताबसोबत मुंबईत कुटुंबापासून वेगळे राहू लागली. श्रद्धाच्या या निर्णयामुळे घरच्यांना राग आला आणि त्यामुळे श्रद्धाने तिच्या कुटुंबीयांशी बोलणे बंद केले. काही महिने मुंबईत राहिल्यानंतर श्रद्धा आणि आफताब दिल्लीला शिफ्ट झाले. या वर्षी 8 मे रोजी श्रद्धा आणि आफताब दिल्लीत आले आणि छतरपूर भागात घर घेऊन राहू लागले, असे सांगितले जात आहे. यानंतर 18 मे रोजी दोघांमध्ये काही कारणावरून भांडण झाले आणि त्यानंतर आफताबने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. हत्येनंतर आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे दिल्लीतील वेगवेगळ्या भागात फेकून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *