महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २२ नोव्हेंबर । साई रिसॉर्टला कोर्टाच संरक्षण आहे. त्या रिसॉर्टशी माझा संबध नाही. असे सांगत अनिल परब यांनी किरीट सोमय्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमय्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचे परब यांनी म्हटले आहे. (Anil Parab said that he will file a criminal case against Kirit Somaiya )
गेल्या काही महिन्यांपासून किरीट सोमय्या विरुद्ध अनिल परब या वादाच्या केंद्रस्थानी राहिलेलं दापोलीतलं साई रिसॉर्ट आज पाडलं जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. अनिल परब यांच्या मालकीचं हे रिसॉर्ट अनधिकृत असल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी सर्वात आधी केला होता. पर्यावरण विभागानं आखून दिलेल्या नियमांचं उल्लंघन करून समुद्रकिनारी हे रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. यावर न्यायालयात रीतसर सुनावणी झाल्यानंतर आज दापोलीतील साई रिसॉर्टवर हातोडा पडणार होता. मात्र, साई रिसॉर्टच्या मालकाने कोर्टात याचिका दाखल केली आहे.
काय म्हणाले परब?
या रिसॉर्टचा मालक मी नसून सदानंद कदम आहेत. ही मालकी त्यांनी कागदोपत्री सिद्ध केलेली आहे. महसूल विभागाच्या सर्व कागदपत्रांत त्यांचे नाव आहे. ज्या नोटिशी आलेल्या आहेत, त्यादेखील त्यांनाच आलेल्या आहेत. मात्र जाणूनबुजबून किरीट सोमय्या माझा संबंध या रिसॉर्टशी लावत आहेत. सदानंद कदम माझे मित्र आहेत. या रिसॉर्टच्या बाबतीत कोर्टाचे जैसे थे असे आदेश आहेत. या आदेशांतर्गत कोर्टाने या रिसॉर्टला संरक्षण दिलेले आहे.
तसेच, सोमय्या यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याचेही परब यांनी म्हटलं आहे.