राज्यपालांचं ‘ते’ विधान झाकण्यासाठी मला अटक झालेली ; संजय राऊतांनी सांगितली पडद्यामागची स्क्रिप्ट

 38 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ नोव्हेंबर । राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाकडून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमा प्रश्नावर बोलण्याची स्क्रिप्ट तयार करुन देण्यात आली आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसंच महाराष्ट्राची जनता शिवरायांचा अपमान अजिबात सहन करणार नाही, दोन दिवसात याबाबतचं पुढचं पाऊल काय असेल हे सांगितलं जाईल, असंही राऊत म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

राऊत यांनी यावेळी त्यांच्या अटकेमागेही अशीच एक स्क्रिप्ट लिहिली गेली होती, असा आरोप केला आहे. “प्रत्येकवेळी कोणत्याही तरी वादग्रस्त विधानावरुन लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपाकडून स्क्रिप्ट लिहिली जात असते. यांचं सारं काही स्क्रिप्टेड असतं. मुंबईतून गुजराती, मारवाडी गेले तर हे शहर देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही, मराठी माणसांना कुणी विचारणार नाही असं विधान याआधी याच राज्यपालांनी केलं होतं. त्यावेळी त्यावरुन जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतला अटक केली गेली”, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

महाभारत होऊन जाऊ द्यात, एकही इंच जमीन देणार नाही
“जतवर दावा करुन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रावर हल्ला केला आहे. यमागे मोठं षडयंत्र आहे. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान केला आहे त्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमावादावर विधान करण्याचं स्क्रिप्ट लिहून दिलं गेलं आहे. पण शिवाजी महाराजांचा जो अपमान झाला आहे तो आम्ही विसरणार नाही. सरकार विरोधात संतापाची लाट आहे. राहिला प्रश्न सीमावादाचा तर महाराष्ट्राची एक इंचही जमीन जाऊ देणार नाही. त्यासाठी पुन्हा महाभारत घडलं तरी चालेल. त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना सज्ज आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

खोके सरकार खोके आलं की राज्यही विकेल
संजय राऊत यांनी यावेळी शिंदे सरकारवर टीका करताना राज्यातलं खोके सरकार दिल्लीवरुन खोके आले तर हे महाराष्टालाही विकतील असा घणाघात केला आहे. “दिल्लीहून खोके आले तर महाराष्ट्राला विकतील, असं हे खोके सरकार आहे. त्यांना काही राज्याची पडलेली नाही. ते गुवाहटीला जाऊ द्यात, लंकेला जाऊ द्या किंवा आफ्रिकेला जाऊ द्यात महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयातून स्थान संपलंय. जनतेनं त्यांचं नाव केव्हाच आपल्या हृदयातून पुसून टाकलं आहेठ”, असं संजय राऊत म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published.