महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ नोव्हेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे आमदार आणि खासदार कुटुंबासह आज गुवाहाटीला जात आहेत. गुवाहाटीमधील प्रसिद्ध कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हे सगळे याठिकाणी जात आहेत. यापूर्वी महाराष्ट्रातील सत्तांतराआधी हे सगळे गुवाहाटीला गेले होते. यानंतर आता राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसह देवीच्या दर्शनासाठी जात आहे.
मुंबई विमानतळावरून सकाळी साडेनऊ वाजता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे 178 सदस्य गुवाहाटीच्या दिशेने विशेष विमानाने उड्डाण करणार आहेत. यासाठी हे सर्व विमानतळावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान गुवाहाटीला निघण्याआधी शिंदे गटाचे हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर या सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं अशी अनेक नेत्यांची इच्छा होती. यातीलच एक संतोष बांगर हेदेखील होते. आता मंत्रिपदाबाबत बोलताना ते म्हणाले, की मला मंत्रिपद हवं आहे. या मागणीसाठी मी देवीकडे साकडं घालणार आहे. माझी टगेगिरी नाही, तर ही माझी स्टाईल आहे, असंही ते यावेळी म्हणाले.