महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ नोव्हेंबर । महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी एसटी बस सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे वक्तव्य यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही राज्यातील ताणवाचे वातावरण निवळेपर्यंत दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत तालुक्यातील गावांची मागणी केल्यामुळे दोन्ही राज्यातील वाद वाढताना दिसत आहे. कर्नाटकच्या बसला दौंडमध्ये शाई फासण्यात आल्यानंतर कलबुर्गीमध्ये महाराष्ट्राच्या बसला काळे फासण्यात आले आहे. या वाढत्या तणावामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातील काही गावांवर दावा सांगितला त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वपक्षीय नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यातील वातावरण तापले आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यात बसला काळे फासण्याच्या घटना घडल्यामुळे दोन्ही राज्यांनी बस सेवा तात्पुरती बंद ठेवली आहे.