महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । उद्धव ठाकरे अजून धक्क्यातून सावरलेले नाहीत. ते प्रचंड नैराश्यात गेले आहेत. म्हणूनच उठसूठ आमच्यावर खोके घेतल्याचे आरोप करत आहे, अशी घणाघाती टीका आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
तसेच, कंटनेर भरून खोके कुणाकडे गेले हे सर्वांना माहित आहे. याबाबत आम्ही नक्कीच तपास करून जनतेसमोर सत्य आणू, असा इशाराही शिंदेंनी ठाकरेंना दिला.
ठाकरेंना प्रत्युत्तर
काल कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंसह उर्वरित आमदार, खासदार आज गुवाहाटीहून महाराष्ट्रात परतत आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी काल बुलढाण्यात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टिकेला शिंदेंनी तशाच शब्दांत प्रत्युत्तर दिले.
कंटेनरएवढे खोके
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, काल आमचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी फ्रिज भरून खोके कुठे गेले होते, याचा शोध घेतला पाहिजे, असे सूचक वक्तव्य केले होते. लहान लहान खोके घेण्याची ऐपत आमदारांकडे असते. मात्र, मोठ-मोठे, फ्रिज, कंटेनरएवढे खोके घेण्याची त्यांची ऐपत नसते. मात्र, असे खोके राज्यात काही ठिकाणी गेले आहेत. ते नेमके कुठे गेले होते?, याचा शोध आम्ही घेणार आहोत.
मी उजेडातच कामे करतो
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, उद्धव ठाकरे अजूनही धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांचा मॉरल पूर्णपणे ढासळलेला आहे. त्यांच्या पूर्णपणे नकारात्मकता गेली आहे. त्यामुळेच ते आमच्यावर वाट्टेल ती टीका करत आहे. मी कोणतेही काम लपून केलेले नाही. लपून छपून केलेली कामे उजेडात येतातच. तशीच तुमची कामेही उजेडात येतील.
आसाममध्ये महाराष्ट्र भवन
दरम्यान, आसामच्या मुख्यमंत्र्यांशीही अनेक विषयांवर चर्चा केल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. शिंदे म्हणाले, आसाममध्ये महाराष्ट्र भवन व्हावे, अशी मागणी मी आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे केली. या मागणीवर त्यांनी तत्काळ होकार दिला आहे. त्यामुळे आसाममध्ये महाराष्ट्र भवन होणार आहे. महाराष्ट्रातून कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांची यामुळे मोठी सोय होणार आहे.