“…अन् त्या बदलाची प्रेरणा असेल शिवछत्रपतींचं एक धोरणी वाक्य!”, राज ठाकरेंच्या सभेआधी मनसेकडून टीझर रिलीज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । आगामी काळात मुंबई, पुणे आणि अन्य महापालिकांच्या निवडणुका पार पडणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षाकडून तयारी सुरु झाली आहे. मनसेने देखील यासाठी कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत गटप्रमुखांचा मेळावा आज ( २७ नोव्हेंबर ) पार पडत आहे. यामध्ये पालिका निवडणुका आणि अन्य राजकीय परिस्थितीवर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे.

गटप्रमुखांच्या मेळाव्यापूर्वी मनसेकडून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. त्यावर “महाराष्ट्रातील राजकारणाने हीन पातळी गाठली अशी सर्वदूर भावना आहे. हे चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढाकार घेणार आणि त्या बदलाची प्रेरणा असेल शिवछत्रपतींचं एक धोरणी वाक्य!,” असं लिहण्यात आलं आहे.

महाविकास आघाडीचे सरकार असताना ४ मे रोजी राज ठाकरेंनी औरंगाबादला शेवटची सभा घेतली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. नवीन सरकार स्थापन झाल्यापासून राज ठाकरेंची ही पहिलीच मोठ्या स्वरूपातील सभा असणार आहे. मुंबईतल गोरेगावच्या नेस्को मैदानात हा गटप्रमुखांचा मेळावा पार पडणार आहे. या सभेत राज ठाकरे कोणाचा समाचार घेतात? काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, राज ठाकरे आठ दिवसांच्या कोल्हापूर आणि कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. याबाबत मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर याची घोषणा करत माहिती देण्यात आली आहे. यानुसार राज ठाकरे २९ नोव्हेंबरला आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील. हा दौरा ६ डिसेंबरपर्यंत चालेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *