महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । साप चावून मृत्यू झाल्याच्या घटनांबद्दल तर तुम्ही ऐकलं असेलच. मात्र, तामिळनाडूमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्योतिषाचा सल्ला ऐकून शेतकऱ्याला सापाला जीभ दाखवणे महागात पडले आहे. त्यामुळं शेतकऱ्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.
सदर घटना ही तामिळनाडूतील इरोडमधील आहे. या शेतकऱ्याचं नाव राजा असं आहे. शेतकऱ्याच्या स्वप्नात नेहमी साप येत होता. स्वप्नामध्ये सापाने चावल्याचं दिसत होते. रोज पडत असलेल्या या भयंकर स्वप्नांना वैतागून त्याने ज्योतिषांचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्याने ज्योतिषांना स्वप्नांबाबत सांगितलं. स्वप्नांपासून सुटका मिळवण्यासाठी ज्योतिषाने त्यांना सर्प मंदिरात जाऊन विधी करण्यास सांगितले
शेतकऱ्याने जवळच्याच सर्प मंदिरात विधी केला. त्यानंतर ज्योतिषाने शेतकऱ्याला आणखी एक भयंकर प्रकार करायला सांगितलं. मंदिरात असलेल्या सापासमोर शेतकऱ्याला तीन वेळा जीभ बाहेर काढायला सांगितले. राजानंही ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे केले. दोन वेळेस त्याने सापासमोर जीभ बाहेर काढली. मात्र, तिसऱ्या वेळेला जेव्हा त्याने जीभ बाहेर काढली आणि त्याचवेळी सापाने चावा घेतला. सापाने डसताच शेतकरी जोरजोरात ओरडायला लागला.
त्यावेळी तिथे असलेल्या लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात नेईपर्यंत तो बेशुद्ध झाला होता. त्याला इरोड येथे असलेल्या मणियन मेडिकल सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल केले. मात्र, आता तो कधीही बोलू शकणार नाही. त्याचा आवाज गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.