महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का?, असा संतप्त सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.
तसेच, महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच, असा इशाराही संभाजीराजेंनी दिला आहे.
कोश्यारींबाबत अद्याप निर्णय नाही
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात उभ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून निदर्शने केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारींचा बचाव केला असला तरी दोन दिवसांपूर्वीच फडणवीस राज्यपालांसोबत दिल्ली दौऱ्यावर गेले होते. यावेळी कोश्यारींविरोधात दिल्लीकरांकडून कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, कोश्यारींविरोधात अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.
पंतप्रधान, राष्ट्रपतींकडूनही प्रतिसाद नाही
युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल असे का बोलतात मला समजत नाही. त्यांना महाराष्ट्राबाहेर पाठवून द्या, अशी हात जोडून पंतप्रधानांना विनंती केलीय. तसेच महाराष्ट्राचे वैभव धुळीस मिळवणारी व्यक्ती नकोय. त्यांच्या मनात घाणेरडा विचार येतोच कसा, असा सवाल केलाय. यासोबतच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही संभाजीराजेंनी पत्र पाठवून कोश्यारींना तातडीने पदावरून हटवा अशी मागणी केली आहे.
राज्यपाल सामाजिक शांततेस बाधा
राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संभाजीराजेंनी म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे त्यांची नियुक्ती झालेपासून सातत्याने महाराष्ट्र राज्य व महापुरूषांबाबत वादग्रस्त व अपमानास्पद विधाने करीत असून राज्यातील सामाजिक सलोखा व शांततेस बाधा पोहोचेल असे वर्तन त्यांच्याकडून होत आहे. अशा वर्तणुकीमुळे “राज्यपाल” या पदाचे देखील अवमूल्यन होत आहे.