सुपारी व्यापाऱ्यांकडे ईडीची छाप : नागपुरसह मध्य भारतात खळबळ

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ डिसेंबर । अंमलबजावणी संचालनालय, ईडीने गुरूवारी नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडे छापेमारी केल्यामुळे नागपुरसह मध्य भारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील सुपारीकिंग छटवाल याला आसाम पोलिसांनी अटक केल्याच्या बातमी नंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा आदींवरही छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

छापेमारी केलेले सर्व व्यापारी विदेशी सुपारी आयात करणारे आहे. यापूर्वीही ते वेगवेगळ्या चौकशी एजंसीच्या रडारवर आलेले आहे. ईडीच्या टिममध्ये मुंबईसह अन्य शहरातून आलेले अधिकारी आहे. या छापेमारीची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरल्याने इतर सुपारी व्यापारी सावध झाले.

नागपुरात सुपारी व्यापाऱ्यांकडे धाडी पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1 जुलै 2021 रोजी सीबीआयने नागपुरातील तीन सुपारी व्यापाऱ्यांकडे धाडी घातल्या होत्या.15 हजार कोटींचा घाेटाळा असल्याच्या संशयावरून नागपुरातील तीन व्यापाऱ्यांकडे धाडी घालीत दस्तावेज ताब्यात घेतले होते. सडक्या सुपारीचा गोरखधंदा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारे सरकारचा कोट्यवधीचा कर बुडवणारे सुपारी व्यापारी नागपुरात आहे. सीबीआयने धाडी घातलेल्या सुपारी व्यापाऱ्यांमध्ये मोहंमद रजा अब्दुल गनी तंवर, बुरहान अख्तर, हिमांशु भद्रा यांचा समावेश होता.

नागपुरात केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी नेहमी पडत राहातात. यापूर्वी 2017 मध्ये बँक ऑफ महाराष्ट्रची 836 कोटी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या मेसर्स सिद्धिविनायक लॉजिस्टिक लिमिटेड (सीव्हीएलएल) कंपनीच्या नागपूरसह देशभरातील ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) छापे टाकले होते. यामध्ये नागपुरातील सिद्धिविनयाक फार्म फ्रेश प्रायव्हेट लिमिटेडच्या गुमथळ्यातील पाच एकर जागेवरीही ईडीने टाच आणली होती.

ईडीने कंपनीची देशभरातील 19 कोटी 62 लाख रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. सीव्हीएलएल या कंपनीचा संचालक रूपचंद बैद आहे. 2013 मध्ये कंपनीने ‘चालक ते मालक’ ही योजना राबविली. २ हजार 804 चालक व कर्मचाऱ्यांच्या नावांचे बनावट दस्तऐवज तयार करून बैद यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमधून 836 कोटी 29 लाख रुपयांचे कर्ज घेतले. नोव्हेंबर 2016 मध्ये ईडीने मेसर्स एसव्हीएलएल व रूपचंदविरुद्ध अवैध सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. रूपचंदने मुंबईतील कोलबादेवी येथे अ‍ॅडव्हान्स मेटल कॉर्पोरेशन कंपनी स्थापन करून बँकेतून 117 कोटींचे कर्ज घेतल्याचेही समोर आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *