PAK vs ENG १st Test : रावळपिंडीत पाकिस्तानने हातची मॅच गमावली, इंग्लंडने बाजी मारली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।५ डिसेंबर। पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना आज पार पडला. आज पहिल्या कसोटी सामन्यातील अखेरचा दिवस पार पडला. पाचव्या दिवशी यजमान पाकिस्तानी संघाने शानदार सुरूवात करून सामन्यात पकड बनवली होती. मात्र अखेरच्या सत्रात इंग्लंडने पुनरागमन केले आणि 74 धावांनी मोठा विजय मिळवला. सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लिश संघाने शानदार फलंदाजी करून यजमान संघाला धु धु धुतले होते. इंग्लंडने आपल्या पहिल्या डावात 101 षटकांत सर्वबाद 657 धावांची विशाल धावसंख्या उभारली होती. यामध्ये इंग्लंडच्या 4 खेळाडूंनी शतकी खेळी नोंदवली. मात्र पाकिस्तानने देखील त्यांच्या डावात शानदार खेळी करून सामन्यात पकड मजबूत केली होती. मात्र अखेरच्या सत्रात इंग्लिश संघाने शानदार पुनरागमन करून कसोटी मालिकेत विजयी सलामी दिली.

पहिल्या डावात इंग्लिश संघाने यजमानांना धुतले
दरम्यान, इंग्लिश संघाच्या सलामीवीरांनी आपल्या पहिल्या डावात पहिल्या बळीसाठी तब्बल 233 धावांची भागीदारी नोंदवली होती. जॅक क्राऊलीने 111 चेंडूंमध्ये 21 चौकारांच्या मदतीने 122 धावा केल्या. याशिवाय त्याने इंग्लंडकडून सलामीवीर म्हणून सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम देखील केला. यानंतर डकेटने 110 चेंडूंमध्ये 107 धावा, तर ओली पोपने 104 चेंडूंमध्ये 108 धावा आणि हॅरी ब्रुक्सने 81 चेंडूंचा सामना करत 14 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 101 धावा केल्या. याशिवाय कर्णधार बेन स्टोक्सने 15 चेंडूंचा सामना करत 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 34 नाबाद धावा केल्या. ब्रुक्सने एका षटकामध्ये 6 चौकारही ठोकले.

दुसऱ्या दिवशी पाकिस्तानी गोलंदाजांचे पुनरागमन
पाकिस्तानने पहिल्या दिवशी दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात 3 बळी घेऊन पुनरागमन केले होते. परंतु क्राऊली आणि डकेटने 233 धावांची भागीदारी केली. जाहिद महमूदने १६० धावांवर दोन गडी, तर हॅरिस रौफने 78 धावा देत 1 गडी बाद केला. तर मोहम्मद अलीने 17 षटकांमध्ये 96 धावा देऊन 1 गडी बाद केला. मात्र दुसऱ्या दिवशी यजमान संघाने शानदार पुनरागमन केले आणि इंग्लंडला 657 धावांवर रोखले. पाकिस्तानकडून झाहिद महमूदने सर्वाधिक 4 बळी पटकावले, तर नसीम शाहने 3 बळी घेतले. याशिवाय मोहम्मद अली (2) आणि हॅरिस रौफला (1) बळी घेण्यात यश आले.

इंग्लिश गोलंदाजही विकेटसाठी तरसले
पाकिस्तानी संघाच्या सलामीवीरांनी आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवसाअखेर 51 षटकांत 181 धावांची भागीदारी नोंदवली. अब्दुल्ला शफीक 158 चेंडूत 89 धावांवर नाबाद आहे, तर इमाम-उल-हक 148 चेंडूत 90 धावा करून खेळपट्टीवर टिकून राहिले. खरं तर दुसऱ्या दिवसाअखेर कोणत्याच इंग्लिश गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या दोन्हीही सलामीवीरांनी आपल्या शतकी खेळीकडे कूच केली होती. तिसऱ्या दिवशी देखील पाकिस्तानी फलंदाजांनी शानदार खेळी केली आणि सलामीवीरांनी आपले शतक पूर्ण केले. पहिल्या डावात पाकिस्तानकडून अब्दुला शफीक (114), इमाम उल हक (121) आणि बाबर आझम (136) या तिघांनी शतक झळकावले. याशिवाय आघा सलमानने 53 धावांची अर्धशतकी खेळी करून सामन्यात पुनरागमन केले. पाकिस्तानने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 579 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या विल जॅक्सने सर्वाधिक 6 बळी घेऊन यजमानांना मोठे धक्के दिले. यासह इंग्लिश संघाने 78 धावांची आघाडी घेतली होती.

इंग्लंडने 247 धावांवर डाव केला घोषित
दुसऱ्या डावात देखील इंग्लिश संघाने शानदार कामगिरी करून 7 बाद 247 धावांवर डाव घोषित केला. मात्र दुसऱ्या डावात कोणत्याच इंग्लिश खेळाडूला शतकी खेळी करता आली नाही. सलामीवीर जॅक क्राऊलीने 48 चेंडूत 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर जो रूट (73) आणि हॅरी ब्रुक (87) धावा करून बाद झाला. याशिवाय कोणत्याच फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. इंग्लिश संघाने 264+78 धावा अशा मिळून यजमानांना 343 धावांचे तगडे आव्हान दिले होते. ज्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला अपयश आले.

पाकिस्तानी संघ दुसऱ्या डावात सुरूवातीपासूनच सावध खेळी करत होता. कारण इंग्लंडच्या संघाने विजयी सलामी देण्याच्या दृष्टीकोनातून डाव घोषित केला होता. तरीदेखील पाकिस्तानी संघाने चौथ्या दिवसाअखेर आपल्या कर्णधारासह आणखी एक गडी गमावला. अब्दुल्ला शफीक (6) आणि बाबर आझम (4) धावा करून तंबूत परतले. तर चौथ्या दिवसाअखेर इमाम उल हक (43) आणि सौद शकील (24) धावा करून खेळपट्टीवर टिकून होते. पाकिस्तानी संघाला अखेरच्या दिवशी विजयासाठी 263 धावा करायच्या होत्या. तर इंग्लिश संघाला मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी 8 गडी बाद करण्याची आवश्यकता होती.

पाकिस्तानने हातचा सामना गमावला
सामन्याच्या अखेरच्या दिवशी यजमान संघाने शानदार सुरूवात केली. चौथ्या दिवसाअखेर नाबाद राहिलेले इमाम उल हक (48) आणि सौद शकील (76) धावा करून बाद झाले. लक्षणीय बाब म्हणजे सौद शकील आणि मोहम्मद रिझवान यांनी शानदार भागीदारी नोंदवून विजयाकडे कूच केली. मात्र अखेरच्या सत्रात इंग्लिश गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन करून सामन्याचा निकाल फिरवला. इंग्लंडकडून 40 वर्षीय जेम्स ॲंडरसनने आणि ओली रॉबिन्सन यांनी सर्वाधिक 4-4 बळी पटकावले, तर कर्णधार बेन स्टोक्सला 1 बळी घेण्यात यश आले. तर जॅक लीचने महत्त्वाचा शेवटचा 1 बळी घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *