महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ डिसेंबर । अलिकडच्या काळात देशात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ झाली आहे. ग्राहक आता बॅटरीवर चालणारी कार, बाइक, सायकल आणि स्कूटर खरेदी करू लागले आहेत. इंधनाचे वाढलेले दर आणि इलेक्ट्रिक वाहनांवर मिळणारी सबसिडी यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढू लागली आहे. त्यातच असा एक देश आहे जिथे इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी (Electric Vehicle Ban) घालण्याची तयारीत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार स्वित्झर्लंड (Switzerland) हा जगातील पहिला देश बनणार आहे जे इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालणार आहे. देशात हिवाळ्यामध्ये वीजची कमतरता भासू नये म्हणून स्वित्झर्लंड हा मोठा निर्णय घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. स्वित्झर्लंड एक असा देश आहे जिथे हिवाळ्याच्या काळात तापमान अत्यंत कमी होते. तर दुसरीकडे देशभरात अनेक भागात हिमवृष्टीही होत आहे. परिणामी या देशातील वीजपुरवठाही प्रभावित होतो. विजेचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन देशात इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याचा विचार केला जात आहे.
स्वित्झर्लंडमध्ये फ्रान्स, जर्मनीसारख्या देशांतून वीजपुरवठा केला जातो. बहुतेक युरोपीय देशांमध्ये हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टी होते. अशा परिस्थितीत त्या देशांमध्ये विजेचा वापरही वाढतो. पण यंदा काही युरोपीय देशांनाच विजेच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत स्वित्झर्लंडला इतर देशांतून पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा करता येईल, अशी आशा कमी आहे.