महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ डिसेंबर । कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या मंत्र्यांना इथे पाय ठेवायला देणार नाही अशी जाहीर धमकी दिली आहे. या धमकीमुळे मिंधे सरकारचे मंत्री गर्भगळीत झाले असून त्यांनी 6 डिसेंबरला कर्नाटकात जाण्याचा निर्णय रद्द केला होता. आम्ही कर्नाटकात जाण्याचं रद्द केलं नसून, आम्ही आणचा दौरा पुढे ढकलला असल्याचं कर्नाटकला जाणाऱ्या मंत्र्यांपैकी एक असलेल्या शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. तिथल्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये या उद्देशाने आम्ही दौरा पुढे ढकलला असल्याचं ते म्हणाले. यावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. ‘महापरीनिर्वाण दिन हा 6 डिसेंबरला असतो हे अख्ख्या देशाला माहिती आहे, त्यामुळे त्यांना 6 डिसेंबरची तारीख निवडताना माहिती नव्हतं का?’ असा प्रश्न पवार यांनी विचारला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना जशास तसं उत्तर देण्याचं काम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे अशी भूमिका पवार यांनी मांडली आहे.
अजित पवार यांनी मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हटले की, ‘महापरीनिर्वाण दिन हा 6 डिसेंबरला असतो हे अख्ख्या देशाला माहिती आहे, त्यामुळे त्यांना 6 डिसेंबरची तारीख निवडताना माहिती नव्हतं का? त्यावेळी त्यांनी सांगायला हवं होतं की 6 डिसेंबरला हा महापरिनिर्वाण दिन असल्याने आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊ. मग त्यांनी पुढची तारीखही सांगावी. बोम्मई म्हणतात आम्ही इथे येऊ देणार नाही, ज्या राज्यात हे दोघे निघाले आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्रीच म्हणतात आम्ही येऊ देणार नाही. हे सरकारचं अपयश आहे, जे झाकण्यासाठी ते थातुरमातुर उत्तरं देतायत.’