सीमेवर महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ डिसेंबर । महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा रद्द झालेला असला तरी गनिमी काव्याने बेळगावात (Belgaon) प्रवेश करतील या धसक्याने महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर (Maharashtra-Karnataka Border) कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना बेळगाव दौरा रद्द झालेला असला तरी पोलीस खात्याने बेळगाव जिल्ह्याच्या सगळ्या सीमेवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर असलेल्या कोगनोळी इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करुन कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. मांगुर हुपरी मार्गावर, संकेश्वर हिटणी मार्गावर, गणेशवाडी कागवाड, अप्पाचीवाडी, रायबाग तालुक्यातील गायकनवाडी आणि खानापूर येथे तपासणी नाके पोलिसांनी उभारले आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील विविध तपासणी नाक्यावर तैनात करण्यात आल्या असून वरिष्ठ पोलीस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी भाषिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजर राहण्यासाठी चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई कर्नाटकात जाणार होते. परंतु कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी महाराष्ट्राच्या मंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध केला. त्यांनी कर्नाटकात येऊ नये असं आवाहन केलं. “सध्या वातावरण बरोबर नाही त्यामुळे ते जर कर्नाटकात आले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. अशा परिस्थितीत आम्ही कर्नाटकात येणार म्हणणे योग्य नव्हे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जनतेत सौहार्दपूर्ण वातावरण आहे. पण त्याचबरोबर सीमाप्रश्न आहे. कर्नाटकच्या दृष्टीने सीमाप्रश्न हा संपलेला अध्याय आहे. पण महाराष्ट्र हे पुन्हा उकरु काढू पाहत आहे. सीमाप्रश्न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या भावना भडकवणयाचा प्रयत्न करणे योग्य नव्हे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये म्हणून बोलून विनंती करणार आहे. तरीही मंत्र्यांनी कर्नाटकात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत,” असं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेशबंदी
दरम्यान चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध घालण्यात आला असल्याचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे. सीआरपीसी 1973, कलम 144 (अ) अन्वये बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश बजावला आहे. 6 डिसेंबर रोजी चंद्रकांत दादा पाटील,शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने हे बेळगावला मराठी भाषिकांशी संवाद साधण्यासाठी आणि काही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणार होते. पण बेळगावात येऊन जर त्यांनी भावना चिथावणारं भाषण अथवा वक्तव्य केलं तर कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचण्याची शक्यता आहे. भाषिक द्वेष देखील निर्माण होऊन सार्वजनिक मालमत्तेची आणि जनतेच्या मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई आणि खासदार धैर्यशील माने यांना आज बेळगाव जिल्ह्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे, असं जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *