महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ७ डिसेंबर । Cristiano Ronaldo Portugal, FIFA World Cup 2022: स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाने फिफा विश्वचषक 2022 च्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. मंगळवारी रात्री उशिरा खेळल्या गेलेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पोर्तुगालनेस्वित्झर्लंडचा ६-१ असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत पोर्तुगालचा सामना मोरोक्कोशी होणार आहे. मोरोक्कोने गतविजेत्या फ्रान्सला पराभूत करत स्पर्धेतील मोठा ‘अपसेट’ केला होता. यात महत्त्वाची बाब म्हणजे, पोर्तुगालचा संघ १६ वर्षांनंतर म्हणजेच २००६ नंतर प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.
रोनाल्डो ‘पहिली पसंती’ नव्हता!
या सामन्यात, पोर्तुगालच्या प्रशिक्षकाने कर्णधार ख्रिस्टियानो रोनाल्डोचा सुरुवातीच्या खेळाडूंमध्ये समावेश न करण्याचा मोठा निर्णय घेतला. हाच निर्णय संघासाठी फायदेशीर ठरला. रोनाल्डोच्या जागी गोंकालो रामोसला सुरुवातीला स्थान मिळाले आणि त्याने शानदार गोल हॅट्ट्रिक केली. याआधी रामोसला साखळी सामन्यांदरम्यान केवळ १० मिनिटे खेळण्याची संधी मिळाली होती. २००८ नंतर ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा रोनाल्डो युरो किंवा विश्वचषकातील कोणत्याही सामन्यात पोर्तुगालच्या सुरुवातीच्या टप्प्यात खेळला नाही. रोनाल्डो खेळाच्या ७२व्या मिनिटाला जोआओ फेलिक्सच्या जागी टाळ्यांच्या कडकडाटात मैदानात आला. मात्र, तोपर्यंत पोर्तुगाल संघाने सामन्यावर कब्जा केला होता आणि ५-१ अशी आघाडी घेतली होती. रोनाल्डोला काही संधी मिळाल्या. एकदा त्याने गोलही केला, पण ऑफसाईडमुळे गोल नाकारण्यात आला.