महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १२ डिसेंबर । केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शरद पवार यांचा आज ८२ वा वाढदिवस आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी सकाळी ट्विट करून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या होत्या. मी शरद पवारांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतो. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर काहीवेळात अमित शाह यांनी थेट फोन करून शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली का, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नाही.
मात्र, सध्या महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन वाद ओढावून घेतला होता. त्यावरुन महाविकास आघाडी आणि शिवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या होत्या. या मुद्द्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पदमुक्त करावे, ही मागणी महाविकास आघाडीने लावून धरली होती. हा वाद सुरु असतानाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत आगीत आणखी तेल ओतले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरातून टीकेची झोड उठली होती. या सगळ्यात शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आघाडीवर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सध्याच्या अत्यंत तप्त राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अमित शाह यांच्यात काही बोलणे झाले का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.