महाराष्ट्र्र २४ – ऑनलाईन – मुंबई – विशेष प्रतिनिधी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज (दि. ११) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. सामंत म्हणाले की, नवीन शैक्षणिक वर्ष १ सप्टेंबर २०२० पासून सुरू होईल. बारावीची राज्य सामाईक प्रवेश परीक्षा तालुका स्तरावर घेण्याचा विचार सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रार निवारण्यासाठी जिल्हा स्तरावर तक्रार निवारण केंद्राची निर्मिती करण्याच्या सूचना विद्यापीठांना दिल्या आहेत.
मुक्त विद्यापीठाला राज्य शासनाचा निर्णय लागू असेल. अकृषी विद्यापीठांसाठी जे नियम असतील तेच त्यांनाही लागू होतील. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार करून या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. पीएचडी आणि एम. फिल. चे प्रबंध सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचा विचार शिक्षण विभाग करीत असल्याचे त्यांनी सांगीतले.
ते पुढे म्हणाले की, सर्व विद्यार्थ्यांनी घरी राहून अभ्यास करावा. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे. आपल्या आरोग्याची आम्ही हमी घेतोय. त्यामुळे याबद्दल कोणी चिंता बाळगण्याचे कारण नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच सर्व निर्णय घेतले गेले आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची आम्ही पूर्णपणे काळजी घेतोय, असा विश्वास व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे बॅकलॉकचे पेपर याच वर्षी घेतले जातील. त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. समाज माध्यमांच्या माध्यमातून चुकीची माहिती प्रसारित करू नये, असे त्यांनी आवाहन केले.
विद्यार्थांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेतल्या जातील. स्वायत्त आणि खाजगी विद्यापीठे यांना महाराष्ट्र शासनातर्फे पत्र पाठविण्यात येणार आहे. स्वायत्त शिक्षण संस्थांची भूमिका ही राज्य शासनाच्या निर्णयानुरूप असणार आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे की ज्याने २५ लाख विद्यार्थांच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामध्ये केवळ विद्यार्थी हेत डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.